दाराशी आलेल्या अतिथीला भिक्षा घालणे इतकेच गृहस्थाचे काम आहे!

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“संन्याशाने आपल्या स्वजनांजवळी अन्न सेवू नये असे शास्त्र स्वामी महाराज सांगती ,
श्री स्वामी महाराज म्हणती दाराशी आलेल्या अतिथीला भिक्षा घालणे इतकेच गृहस्थाचे काम आहे ,

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री स्वामी महाराज मंथनकालेश्वरहून पवनीला आले. या प्रवासात त्यांचे बंधू श्री सितारामबुवा हेही त्यांच्या बरोबर होते. या प्रवासात त्यांना काही वेळा अन्नाशिवाय राहावे लागत असे. अशा वेळी त्यांना श्री सीतारामबुवांच्या शिजवलेल्या अन्नाची सुद्धा भिक्षा घेता येत नसे. कारण ‘संन्याशाने आपल्या जवळच्या नातेवाईकांचे अन्न सेवू नये अशी शास्त्रज्ञा आहे. त्यामुळे असेल शिजवलेले मूग व विकत आणलेल्या दह्याचे ताक श्री सितारामबुवा मध्याकाळी श्रीमहाराजांना देत व आपणही तोच फलाहार घेत. मुग हे अन्नात गणले जात नाहीत, त्यामुळे फलाहार समजून श्री स्वामी महाराज त्याचा स्वीकार करीत असत. तोही बिनमिठाचा अळणीच असे. महिनाभर दोघांचा हाच आहार होता पवनी येथे आल्यावर वैनगंगेत स्नान करून श्री स्वामी महाराजांनी तिच्या स्तुतिपर स्त्रोत्र रचले.

पवनी हे ठिकाण अतिशय प्रसन्न व सोयीचे आहे. असे पाहून शके 1831 चे एकोणिसावे चातुर्मास येथेच करण्याचे श्री स्वामी महाराजांनी ठरविले. सुरुवातीला ते श्री वैजनाथाच्या मंदिरांत उतरले होते. पण तेथील मंडळींना त्यांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तीन दिवसानी त्यांनी मुक्काम हलविला व ते श्री दशपुत्रे त्यांच्या श्री विठ्ठल मंदिरात राहायला गेले. पहिल्या दिवशी श्री स्वामी महाराज श्री नाईक यांच्या घरी भिक्षेला गेले होते. पण ते गुजराथी ब्राह्मण असल्याचे समजले. त्यांनी ती भिक्षा तशीच ठेवली. दुसऱ्या दिवशीही उपोषण घडले. तिसऱ्या दिवशी ते श्री भट नावाच्या दक्षिणी ब्राह्मणाकडे गेले. तेथे त्यांना भिक्षा वाढण्याऐवजी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली “आपण कुठचे राहणारे? आपण संन्यासाश्रम का स्वीकारला? आपल्या कुटुंबात कोण कोण मंडळी आहे? आपण संन्यास घेऊन किती दिवस झाले? आपण कुठल्या पंथाचा संन्यास घेतला?” अशा प्रकारे चौकशी सुरू केली. पण त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता श्री स्वामी महाराज म्हणाले “दाराशी आलेल्या अतिथीला भिक्षा घालेणे इतकेच गृहस्थाचे काम आहे!”

इतक्यात काय गडबड आहे हे पाहण्यासाठी श्री भटांच्या सौ. उमाबाई बाहेर आल्या. त्यांचे सासर उमरेड येथे होते व त्यांना त्यांची महिमा माहीत होता. त्या वडिलांना म्हणाल्या “अहो बाबा काय करता? आपण यांना ओळखले नाही का? हे श्रीनरसोबावाडीचे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. प्रत्यक्ष श्री दत्तावतारच आहेत हे!” हे ऐकल्याबरोबर मात्र श्री भटांनी श्री स्वामी महाराजांची क्षमा मागून त्यांना आदरपूर्वक भिक्षा घातली. सौ. उमाबाई त्यानंतर दररोज श्री स्वामी महाराज राहत होते, त्या विठ्ठल मंदिरात जाऊन झाडलोट करून शक्य असेल ती सेवा करू लागल्या. सौ. उमाबाईमुळे श्री स्वामी महाराजांविषयी माहिती लोकांना झाली. येथेही इतर ठिकठिकाणाप्रमाणेच गर्दी दिवसानुदिवस वाढत गेली. दररोज निरनिराळ्या ग्रंथांचे पाठ सुरू झाले लघुरुद्र, महारुद्र, सहस्त्रभोजन इत्यादी विविध कार्यक्रम सुरू झाले.

आपली प्रतिक्रिया द्या