करण जोहर पक्का स्वार्थी मनुष्य! ज्येष्ठ अभिनेत्रीची टीका

सामना ऑनलाईन । मुंबई

करण जोहर हा एक स्वार्थी मनुष्य असल्याची टीका एका ज्येष्ठ अभिनेत्रीने केली आहे. ही ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. अभिनयात कारकीर्द करू नये म्हणून त्यांच्या मुलीचं मन वळवावं यासाठी नीना यांनी करणला विनंती केली होती. मात्र त्याने त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याची टीका गुप्ता यांनी केली आहे.

neena-gupta

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्या म्हणाल्या की, एका फ्लाईटमध्ये असताना माझी भेट करण जोहरशी झाली होती. त्याला मी माझ्या मुलीला- मसाबाला अभिनय करायचा असल्याचं सांगितलं होतं. मला तिने अभिनयात करिअर करू नये असं वाटत होतं. मी तिला तसा सल्लाही दिला होता. करणनेही तिला समजावून सांगावं, अशी विनंती मी त्याला त्या भेटीत केली होती. त्याने त्याबाबत मदत करायचं आश्वासन देऊन त्याचा नंबर मला दिला होता. मी काही काळाने त्या नंबरवर कॉलही केला होता. पण, त्याने माझे फोन उचलले नाहीत, अशा शब्दात नीना गुप्ता यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

या अनुभव कथनानंतर नीना यांनी उपहासात्मक शैलीत म्हटलं की, किती खालच्या दर्जाचा आणि स्वार्थी मनुष्य आहे तो. त्याने मला फोन नंबर दिला, पण मी केलेले फोन मात्र त्याने उचलले नाहीत. नीना गुप्ता यांनी याच प्रकारची टीका अभिनेता शाहरुख खान याच्यावरही केली आहे. नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा ही सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर असून जगभरात तिच्या ब्रँडचे स्टोअर्स आहेत.