
नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने आज अटक केली. त्याला गुरुवारी लातूरमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी सीबीआयने गेल्या 24 तासांत देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने कुलकर्णी याला प्रश्नपत्रिकेपर्यंत थेट प्रवेश मिळाल्याची बाब समोर आली आहे.
सीबीआयच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस कुलकर्णीने आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना गुप्तपणे एकत्र केले. पुण्यातील स्वतःच्या निवासस्थानी त्याने विशेष मार्गदर्शन वर्ग घेत प्रश्न, पर्याय आणि अचूक उत्तरे विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी वहीत उतरवून घेतलेले हे प्रश्न 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणात जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित आरोपींना दिल्लीला हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळून ‘विशेष क्लासेस’च्या माध्यमातून प्रश्नसंच पुरविणारे दलाल, मध्यस्थ आणि शिक्षण क्षेत्रातील काही संशयितांचे जाळेही तपास यंत्रणांच्या रडारवर आहे.
































































