लग्नावेळी 600 शिवराळ मेसेज मिळाले होते, अभिनेत्री नेहा धुपियाचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री नेहा धुपिया ही बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी अचानक लग्नाची घोषणा करून तर कधी रियालिटी शोमधल्या तिच्या वक्तव्यावरून तिला ट्रोल केलं गेलं आहे. 10 मे रोजी तिच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता. या निमित्ताने तिने लग्नाच्या वेळी आलेला एक कटू अनुभव शेअर केला आहे.

नेहा धुपिया हिने 10 मे 2018 रोजी अभिनेता अंगद बेदीसोबत लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी गुप्तता बाळगली होती. लग्नाची तारीख अचानक जाहीर करण्यात आल्यामुळे नेहाच्या चाहत्यांसह प्रेक्षकही बुचकळ्यात पडले होते. पण, लग्नापूर्वीच नेहा गर्भवती राहिल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचं पुढील काही महिन्यात कळून चुकलं.

जेव्हा नेहा आणि अंगद यांचं लग्न झालं तेव्हा त्यांनी आपली ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. पण, त्यावर लोकांच्या अशा काही प्रतिक्रिया आल्या की त्यामुळे या दोघांच्याही आनंदावर विरजण पडलं. त्यांना सोशल मीडियावर 600 असे मेसेज आले होते, ज्यात शुभेच्छा नव्हत्या. त्यात शिवराळ भाषेत अपमान करण्यात आला होता.

या मेसेजमध्ये लोकांनी तिला टोमणे देखील मारले होते. 37व्या वर्षी तिने केलेल्या विवाहावरून अनेकांनी तिला सुनावलं होतं. लग्नात अतिशय कमी पाहुण्यांना बोलवण्यावरून लोकांनी तिला बोल लावले होते. अंगद हा नेहाहून वयाने कमी असल्यावरूनही तिला ऐकावं लागत होते, असं तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.