
मराठी चित्रपट सृष्टीतील बोल्ड अभिनेत्री आणि ‘बिग बॉस-12’ची स्पर्धक नेहा पेंडसे विवाहबंधनामध्ये अडकली आहे. 5 जानेवारी, 2020 ला नेहाने बॉयफ्रेंड शार्दुल सिंहसोबत पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्न केले.

नेहा पेंडसे आणि शार्दुल सिंह या नवदाम्पत्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दोघांनाही चित्रपट सृष्टीसह चाहत्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रविवारी पुण्यामध्ये दोघांचा थाटामाटात विवाह पार पडला. या विवाहसोहळ्याला दोन्हीकडच्या पाहुण्यासह जवळचे मित्रमंडळीही उपस्थित होते. दोघांचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याच काळापासून आपल्या लग्नाची विशेष तयारी करत होती. लग्नासाठी तिने खास कपडे आणि दागिनेही तयार करून घेतले. लग्नात दोघेही पेस्टल शेडच्या जोड्यामध्ये दिसून आले.

लग्नापूर्वीच नेहाने संगीत, हळद, साखरपुड्यासाठी कल्कीने डिझाईन केलेले लहंगा-चोळी घातली होती. या ड्रेसला हिरव्या रंगाची कढाई करण्यात आली होती.

हिरवा रंग शार्दुलला आवडतो, म्हणून तो रंग निवडला, असे नेहाने सांगितले होते. तसेच लग्नामध्ये नऊवारी साडी घालणार असल्याचेही तिने स्पष्ट केले होते. नऊवारी साडी पेस्टल शेडमध्ये असणार असल्याचेही तिने स्पष्ट केले होते.

दरम्यान, नेहाचा पती शार्दुल हा व्यावसायिक असून गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याचे समजते. 15 ऑगस्ट रोजी नेहाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिचा शार्दुलसोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले होते.






























































