अराजक आणि आगडोंब; हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये ‘जेन झी’ क्रांती… पंतप्रधान ओली अज्ञातस्थळी, राष्ट्रपती पोडेल यांचा राजीनामा, लष्कराने ताबा घेतला

हुकूमशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमध्ये आज अभूतपूर्व ‘जेन झी’ क्रांती झाली. राजकर्त्यांच्या मनमानीविरोधात सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरलेल्या 18 ते 30 वर्षांच्या तरुणांनी राजधानी काठमांडूसह अनेक शहरांचा ताबा घेत तुफान जाळपोळ, दगडफेक, तोडफोड आणि लुटमार केली. आंदोलकांनी संसद, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, मंत्रालय, राजकीय पक्षांची कार्यालये आणि पंतप्रधानांचे निवासस्थान पेटवून दिले. देशाचे उपपंतप्रधान व अर्थमंत्री विष्णू पोडेल यांना भररस्त्यात कपडे काढून तुडवण्यात आले. क्रौर्याची परिसीमा गाठत आंदोलक मंत्र्यांच्या राहत्या बंगल्यात घुसले. माजी पंतप्रधान शेर बहादूर आणि त्यांची पत्नी आरजू राणा यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली; तर माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांचे घर जाळण्यात आले. त्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. आंदोलकांच्या रुद्रावताराने हादरलेले नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पोडेल, पंतप्रधान के.पी. ओली यांच्यासह बहुतेक सगळे मंत्री राजीनामे देऊन अज्ञात स्थळी पळून गेले. त्यामुळे अभूतपूर्व अराजक निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर लष्कराने देशाचा ताबा घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नेपाळ सरकारने मेटा, अल्फाबेट, एक्ससह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नेपाळच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी एक आठवडय़ाची मुदत दिली होती. मात्र, कंपन्यांनी ती पाळली नाही. त्यानंतर सरकारने फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍपसह बहुतेक सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी आणली. या बंदीमुळे केवळ संवादच थांबला असे नाही तर, रोजगारासाठी सोशल मीडियावर अवलंबून असलेल्या लाखो तरुणांपुढे पोटापाण्याचे संकट उभे राहिले. परिणामी हे तरुण रस्त्यावर उतरले. त्यास भ्रष्टाचारविरोधाची जोड मिळाल्याने नेपाळमध्ये आंदोलनाचा वणवा पेटला.

हिंदुस्थानी पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना

नेपाळमध्ये अडकून पडलेल्या हिंदुस्थानी पर्यटकांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत हिंदुस्थानी नागरिकांनी नेपाळला जाऊ नये. जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी घरातच राहावे, बाहेर पडू नये. स्थानिक प्रशासनाने व नेपाळमधील हिंदुस्थानी दूतावासाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

बालेन शाह यांचे शांततेचे आवाहन

आदिपुरुष सिनेमातील काही संवादांना आक्षेप घेत बालेन शाह यांनी 2023 मध्ये काठमांडूमध्ये हिंदुस्थानी सिनेमे प्रदर्शित करण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. बालेन यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. पंतप्रधान ओली व इतर मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तुमची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय संपत्तीची जाळपोळ करू नये, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे.

नक्खू कारागृहातून 1500 कैदी पसार

नेपाळमधील नक्खू कारागृहात 1500 कैदी ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे रवी लामिछाने यांच्या सुटकेसाठी आंदोलकांनी या काराग़ृहावर हल्ला केला. लामिछाने यांना प्रशासनाने सोडले. परंतु आंदोलकांच्या भीतीपोटी कारागृहात बंदोबस्तावर असलेले पोलीस पळून गेले. त्यामुळे कारागृहातील 1500 कैदीही संधी साधून पसार झाले.

मंत्र्यांना घरातच कोंडले, हेलिकॉप्टरने सुटका

आंदोलकांनी ओली मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना त्यांच्या घरातच कोंडले. एवढेच नाहीतर हे मंत्री घराबाहेर पडू नयेत म्हणून पहाराही लावला. लष्कराने हेलिकॉप्टरच्या मदतीने मंत्र्यांची सुटका केली. मात्र अजूनही काही मंत्री घरातच कोंडलेले असल्याचे सांगण्यात आले.

नेपाळमधील हिंसाचार वेदनादायी – मोदी

नेपाळमधील हिंसाचाराकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘हा हिंसाचार हृदय विदीर्ण करणारा आहे. या हिंसाचारात अनेक तरुणांना जीव गमवावा लागला हे दुःखद आहे. नेपाळमधील शांतता व स्थैर्य असणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

शांततेने मागण्या मांडा!

लष्कराने आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. नेपाळी लष्कर देशाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात असे लष्कराने म्हटले
आहे.

उपपंतप्रधानांना तुडवले

उपपंतप्रधान विष्णू पोडेल यांना काठमांडूच्या रस्त्यावर आंदोलकांनी तुडवतुडव तुडकले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोडेल यांच्या मागे जमाव धावत असल्याचे दिसत आहे. एका आंदोलकाने त्यांचे कपडे फाडले तेव्हा ते भिंतीवर आदळले. ते उठून पळत असतानाच त्यांचा पाठलाग करून आंदोलकांनी त्यांना लाथा घातल्या.

कोण आहे बालेन शाह?

जेन झी आंदोलकांनी पंतप्रधान पदासाठी बालेन शाह यांचे नाव सुचवले आहे. बालेन शाह हे काठमांडूचे महापौर आहेत. अवघ्या 35 वर्षांचे बालेन हे मूळचे रॅपर आहेत. मे 2022 पासून ते काठमांडूच्या महापौरपदी आहेत. सिव्हिल इंजिनीअर असलेल्या बालेन यांनी कर्नाटकातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीतून स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे.

काठमांडू शहरात जाळपोळ, दगडफेक, लुटालूट, गोळीबार… शरण आलेल्या पोलिसांना ठेचून मारले!

नेपाळी आंदोलकांनी कोटेश्वर पोलीस ठाण्यावर हल्ला चढवून तेथील तीन पोलिसांना बाहेर काढले. त्यानंतर पोलीस ठाण्याला आग लावली. आंदोलकांच्या तावडीत सापडलेल्या पोलिसांनी शस्त्रs खाली ठेवून शरणागती पत्करली. मात्र, त्यानंतरही जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. त्यात तिघांचाही मृत्यू झाला.

सुदन गुरुंग याने टाकली ठिणगी

नेपाळमध्ये पेटलेल्या जेन झी आंदोलनाची पहिली ठिणगी 36 वर्षीय सुदन गुरुंग याने टाकली होती. गुरुंग हा ‘हामी नेपाल’ या संघटनेचा अध्यक्ष आहे. नेपाळमधील भ्रष्टाचार, घराणेशाही, नेत्यांची संपत्ती याविरोधात तो सातत्याने आवाज उठवत होता. तरुणांमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यानेच 8 सप्टेंबर रोजी आंदोलनाची हाक दिली व आंदोलनाचे स्वरूप कसे असेल हेही सोशल मीडियातून सांगितले होते. ‘नेपो कीड’ आणि ‘नेपो बेबीज’ हे हॅशटॅग सुरू करून आंदोलनाला हवा दिली.

हिंदुस्थानात अलर्ट, सीमेवरील राज्यांत सुरक्षेत वाढ

नेपाळमधील आंदोलनानंतर हिंदुस्थानात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांतील सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे. बिहार, उत्तराखंड, यूपी, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. बिहारमधील अरारिया, किशनगंज आणि पूर्व चंपारण जिह्यात सशस्त्र सीमा बलाने गस्त वाढवली आहे. नेपाळमधून येणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

अशांत देशांचा वेढा; श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये टेन्शन

अराजकाच्या खाईत सापडलेला नेपाळ हा हिंदुस्थानचा एकमेव शेजारी नाही. हिंदुस्थानला अशांत देशांचा वेढाच पडलेला आहे. याआधी श्रीलंका, बांगलादेश व म्यानमारमध्येही असेच रक्तरंजित सत्तांतर झाले आहे. पाकिस्तान हा कायमच अराजकाने खदखदत असतो. या शेजारी राष्ट्रांतील घडामोडींचा थेट परिणाम हिंदुस्थानवर होतो. त्यामुळे हिंदुस्थान नेपाळमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.