
31 मे च्या सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हैदराबाद येथून दागिने, रोकड असा दोन कोटी 62 लाखाचा ऐवज घेऊन आलेल्या दोघांचे अपहरण करून तो ऐवज लुटणार्या आरोपींना अखेर शीव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजस्थान येथून मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला पकडण्यात आले. तर ज्याचे अपहरण झाले होते त्यालाही अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार तसेच एक कोटी 73 लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
हैदराबाद येथील प्रसिद्ध सराफ संतोष नरेडी यांच्याकडे कामाला असलेला हरिराम घोटिया हा त्याचा भाचा प्रशांत चौधरी यांच्यासोबत 31 मे रोजी पावणे तीन कोटी किंमतीचा ऐवज घेऊन मुंबईत आला होता. शीव येथे बसमधून उतरल्यानंतर ते दोघेही एका बस स्टॉपजवळ उभे असताना एक इनोव्हा कार तेथे आली व गाडीत बसलेल्यांनी ते दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून प्रशांत आणि घोटियाला सोबत घेऊन गेले. त्यानंतर भिवंडी मार्गे गणेशपुरी येथे जाऊन त्या दोघांना गाडीतून बाहेर काढले व त्यांच्याकडून सोने,हिर्याचे दागिने, रोकड असा दोन कोटी 62 लाखाचा ऐवज घेऊन पसार झाले होते. घडल्याप्रकरणी शीव पोलीस ठाण्यात अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ निरीक्षक मधू घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, शेवाळे, साबळे, सपोनि विकास जाधव, संतोष तागडे आदींसह पोलीस अमंलदार लक्ष्मण निकम यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक बाबीचा अभ्यास केला असता आरोपी तामिळनाडूला पळून गेले असल्याचे समजले. परंतू अधिक तपास केला असता आरोपींनी इनोव्हाला तामिळनाडूची नंबर प्लेट लावली होती व ते राजस्थानला पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी राजस्थान गाठून या गुन्ह्याचा मास्टर माईंड महेंदर जाट (23) आणि त्याचा साथीदार मनोजकुमार सिंह (33) अशा दोघांना पकडले. त्यांच्याकडून एक कोटी 73 लाखा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
भाच्याने मामाला भनक लागू दिली नाही
प्रशांत हा त्याचा मामा घोटिया याच्यासोबत नरडी ज्वेलर्समध्ये कामाला होता. ही बाब महेंदरला ठाऊक होती. महेंदरने प्रशांतचे ्रेब्रेनवॉश केले आणि आपण मोठा हात मारू, म्हणजे झटपट मालामाल होता येईल असे सांगितले. महेंदरच्या बोलण्याना बळी पडून प्रशांतने हैदराबादवरून कोट्यावधी किंमतीचे दागिने मुंबईला कधी आणणार याची माहिती महेंदरला दिली. राजस्थानात कार डिलरचे काम करणारा महेंदर मनोजकुमार व अन्य एकाला सोबत घेऊन राजस्थानहून हैदराबादमध्ये गेला. तेथून ते 30 तारखेला रात्री घोटिया, प्रशांत ज्या बसने मुंबईला आले. त्या बसचा पाठलाग करत आले. खोपोली टोलनाक्यावर महेंदरने तामिळनाडू राज्याचे नंबरप्लेट लावून मुंबईत आले. मग मामा-भाच्याचे अपहरण केल्याचे पद्धतशीर नाटक केले. पण शीव पोलिसांनी शिताफिने तपास करीत आरोपीचे मनसुबे उधळून लावले.





























































