
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
शेतजमीन व आर्थिक व्यवहाराच्या वादामधून पुतण्यानेच काकाचा खून केल्याचा गुन्हा बुलढाण्यात उघड झाले आहे. मधुकर सखाराम कापरे (65) असे हत्या झालेल्या काकाचे तर योगेश कापरे (21) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे.
सुनगाव शिवारात धारदार शस्त्राने डोक्यात वार करुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केला अशी फिर्याद जळगाव जामोद पोलीस ठाण्यात 9 जानेवारी रोजी दाखल झाली होती. त्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला. फिर्यादी पांडुरंग मधुकर कापरे (35) यांनी दिलेल्या फिर्यादीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला. मधुकर कापरे (रा. सुनगाव) यांचा खुन करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कसून चौकशीअंती गुन्ह्यातील आरोपी मयत मधुकर यांचा पुतण्या योगेश कापरे (रा. सुनगाव) यास ताब्यात घेतले. सलग 13 तास चौकशी केली असता शेवटी आरोपी योगेश याने गुन्हा कबुल केल्याने गुन्ह्याचा उलगडा झाला.
चौकशीमध्ये आरोपी हा मयताचा सख्खा पुतण्या असून त्यांच्यामध्ये शेतजमीन व आर्थिक व्यवहाराचा वाद होता. तसेच मयत हा आरोपीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन टोचून बोलत होता. घटनेच्या दिवशी सुद्धा मयत मधुकर हा आरोपी पुतण्या योगेश यास विनाकारण उलट-सुलट बोलल्याने त्याने काकाच्या डोक्यात कुर्हाड मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरिक्षक महेंद्र देशमुख व त्यांचे सहकार्यांनी केली आहे.

























































