
नेस्को ड्रग पार्टीप्रकरणी आणखी एका संशयिताला वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा संबंध हा आनंद पटेल, विनीत, शुभ आणि आयुषशी होता. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्याची चौकशी करत होते.
नेस्को येथील संगीत कार्यक्रमादरम्यान ड्रगच्या सेवनाने दोघांचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल वनराई पोलिसांनी घेतली. पोलिसांनी तपास करून दहा जणांना अटक केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 45 जणांचे जबाब नोंदवले आहेत. वनराई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आयुषच्या बहिणीचादेखील जबाब नोंदवून घेतला आहे. विनीतने काही पैसे आयुषच्या बहिणीच्या खात्यात ट्रान्स्फर केले होते. तर सध्या अटकेत असलेल्या प्रतीक पांडे एमबीएच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसवण्यास परवानगी दिली आहे.
नेस्कोच्या घटनेनंतर पोलीस संगीत कार्यक्रमाच्या परवानगीसाठी एक एसओपी तयार करणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि आत साध्या वेशात पोलीस तैनात केले जाणार आहेत. तसेच मद्यपान आणि संबंधित हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी अमली पदार्थ आणि मद्य पदार्थ नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्याची जबाबदारी आयोजकांवर सोपवली जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित लोक केवळ अधिकृत प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतील याचीदेखील जबाबदारी आयोजकावर असणार आहे.
























































