
सामना प्रतिनिधी, नेवासा
ज्ञानोबा माऊली.., तुकारामाचा जयघोष करीत भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली दिंडी शुक्रवारी सकाळी ९ वाजता पंढरपूरकडे निघाली. या दिंडीमध्ये सुमारे १ हजार ४०० महिला – पुरुष भाविकांचा समावेश आहे. प्रस्थानापूर्वी ह.भ.प. भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह पालखीमध्ये ठेवण्यात आलेल्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार ज्योतीप्रकाश जायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अग्रभागी अश्व, झांज पथक, बँण्डपथक, पांढराशुभ्र पोशाख घालून शिस्तीत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत चाललेले झेंडेकरी, भजनी मंडळाचे पथक त्यामागे दिंडीत सहभागी वारकरी भाविक, डोक्यावर तुलसी कलश घेत नामस्मरण करणाऱ्या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप आहे. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने दिंडीसोबत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
































































