शत्रूला धडकी भरणार!हिंदुस्थानला मिळणार नवीन एअर डिफेन्स सिस्टम

pakistan-missile

हिंदुस्थानी लष्कराला लवकरच एक नवीन आणि शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टम मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यात ही सिस्टम आल्यानंतर हिंदुस्थानच्या शत्रूला नक्कीच धडकी भरणार आहे. ही एअर डिफेन्स सिस्टम खूपच शक्तिशाली असून शत्रूंच्या कोणत्याही ड्रोनला हिंदुस्थानच्या सीमेत घुसताच खाली पाडण्याचे काम ही एअर सिस्टम करणार आहे. संरक्षण मंत्रालय जी नवी एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करणार आहे, तिचे नाव ‘क्विक रिएक्शन सरफेस-टू-एयर मिसाइल’ असे आहे. या सिस्टमचे तीन रेजिमेंट खरेदी करण्यावर संरक्षण मंत्रालय विचार करत आहे. ही एक स्वदेशी सिस्टम असणार आहे. यासाठी कमीत कमी 30 हजार कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. संरक्षण मंत्रालय लवकरच या डीलसाठी मंजुरी देणार आहे. हा निर्णय हिंदुस्थानी एअर डिफेन्स सिस्टमला आणखी मजबूत करणारा आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) या महिन्याच्या अखेरपर्यंत अत्याधुनिक मोबाईल क्यूआर-एसएएम सिस्टमसाठी आवश्यक मंजुरी देणार आहे. या सिस्टमला 25 ते 30 किलोमीटरपर्यंत दूर अंतरावर शत्रूंच्या लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोनला रोखता येईल.

काय आहे क्यूआर-एसएएम

‘क्विक रिएक्शन सरफेस-टू-एयर मिसाइल’ अर्थात क्यूआर-एसएएम एकाच वेळी शत्रूंच्या अनेक लक्ष्यांना ट्रक करते. ही सिस्टम पूर्णपणे ऑटोमेटिक असून फायरिंगचे निर्णय घेते. कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून लाँच केले जाऊ शकते. मग ते ट्रक असो की बंकर किंवा मोबाईल यूनिट. यासोबत डीआरडीओ कमी अंतरावरील वायू संरक्षण मिसाईल सिस्टमसुद्धा तयार करत आहे. याची रेंज केवळ 6 किलोमीटर असेल. या दोन्ही सिस्टममुळे हिंदुस्थानी वायू संरक्षण क्षमता वाढण्यास मदत होईल.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्णय

पाकिस्तानविरोधात राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हिंदुस्थानने हा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानच्या एस-400 सिस्टमने पाकिस्तानकडून केलेल्या तुर्कीच्या ड्रोनला आणि चीनच्या मिसाईलला यशस्वीपणे खाली पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे हिंदुस्थानकडे आणखी अत्याधुनिक सिस्टम असावी, अशी गरज निर्माण झाल्याने नवीन एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याची तयारी करण्यात आली आहे. डीआरडीओ आणि हिंदुस्थानी लष्कराने 3 ते 4 वर्षांत अनेक हवाई हल्ल्याविरोधात यशस्वी कारवाई केली आहे.