शिवसेनेच्या प्रयत्नांना यश, विजेच्या लपंडावातून दिवावासीयांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

नाव दिवा असले तरी विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या दिवावासीयांची लवकरच अंधारातून कायमची सुटका होणार आहे. शिवसेनेच्या जबरदस्त प्रयत्नामुळे एका महिन्यात शहरात नवीन 22 ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम महावितरण मार्गी लावणार आहे. तसेच गोठेघरनंतर बेतवडे सबस्टेशनही लवकरच सुरू होणार असल्याने दिव्यातील विजेची समस्या दूर होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाआधीच दिवावासीयांना बाप्पा पावला आहे.

दिवा व आजूबाजूच्या परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सध्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची गंभीर दखल घेऊन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक बोलावली. मध्यंतरी सलग चार दिवस दिव्याचा वीजपुरवठा बंद होता. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून खासदार डॉ. शिंदे यांनी या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यासाठी किमान 25 नवीन ट्रान्सफार्मर्स तत्काळ बसवावेत तसेच उच्च दाबाच्या व कमी दाबाच्या विद्युतवाहिन्या भूमिगत कराव्यात, अशा सूचना दिल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनुसार तातडीने 11 ट्रान्सफार्मर्स पुढील 20 ते 25 दिवसांत उभारले जातील व आणखी 11 ट्रान्सफार्मर्ससाठी निधीची तरतूद तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी प्रकल्प संचालक श्रीकांत जलतरे यांनी दिले. या बैठकीला उपमहापौर रमाकांत मढवी, महावितरणचे मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता राजेश थुळ, कार्यकारी अभियंता पांडुरंग हुंडेकरी व इतर अधिकारी उपस्थित होते.

भूमिगत विद्युतवाहिन्यांचा अडथळा दूर करणार
ठाणे महापालिकेतर्फे रस्तारुंदीकरण करण्यात येणार असून प्रशासनाकडून रस्त्याचे आलेखन मिळाल्याशिवाय भूमिगत विद्युतवाहिन्या टाकता येणार नाही याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. हा अडथळा दूर करण्यासाठी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांकडून लवकरच रस्त्यांची आखणी करून सदर वाहिन्या टाकण्यास परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिले.

summary- new electric transformers for diva residents