खड्डेमुक्तीसाठी पालिकेचे नवे तंत्रज्ञान, हायड्रोलिक प्रेस पद्धतीचे पेव्हर ब्लॉक्स, एम 60 काँक्रीट, स्टील प्लेट आणि राखेचे ब्लॉक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खड्डेमुक्त मुंबईसाठी अनेक उपाययोजना आणि कोटय़वधी रुपये खर्च करूनही पावसाळय़ात खड्डय़ांची समस्या निर्माण होत असल्याने पालिकेने आता खड्डे बुजवण्यासाठी नवी इंजिनीअरिंग टेक्नॉंलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हायड्रोलिक प्रेस पद्धतीने तयार केलेले पेव्हर ब्लॉक्स, एम 60 काँक्रीट, राखेचे ब्लॉक्स आणि स्टील प्लेट यांचा वापर करण्यात येणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

मुंबईत सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले जात असले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे ते पुन्हा खड्डे होतात. यात प्रामुख्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे तयार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोल्ड मिक्ससारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरण्यात आले तरी जोरदार पाऊस आणि वाहतुकीच्या ताणामुळे उपायोजनांचा टिकाव लागत नाही. खड्डे पुन्हा तयार होऊन खडी व इतर कण रस्त्यावर पसरून अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे या कामाचा अतिरिक्त ताण पालिकेच्या यंत्रणेवर येत आहे. यासाठी खड्डे भरण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता खड्डे बुजवण्यासाठी नवीन इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज असल्याचे वेलरासू म्हणाले. या पार्श्वभूमीवर पी. वेलरासू यांनी आज दिवसभर पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणी भेटी देऊन खड्डे बुजविण्याच्या कामांची पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी एमएमआरडीएद्वारे मेट्रो रेल्वे कामांसाठी रस्ते सुपूर्द केले आहेत त्या ठिकाणीदेखील खड्डे भरण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे सक्त निर्देशही वेलरासू यांनी दिले. यावेळी पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले, पर्जन्य जलवाहिन्या प्रमुख अभियंता अशोक मेस्त्रा, उपप्रमुख अभियंता (रस्ते) मनोज कामत, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) भाग्यवंत लाटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अशी होणार कार्यवाही

* हायड्रोलिक प्रेस पद्धतीने तयार केलेले पेव्हर ब्लॉक्स हे तातडीने खड्डय़ात भरता येतात. जेणेकरून वाहनांची वाहतूक लगेच सुरू करता येते.
* एम 60 ग्रेडमध्ये वेगवेगळय़ा आकारामध्ये मोठय़ा आकाराच्या लादी बनवून (प्रीकास्ट काँक्रीट प्लेट्स) वापरणे शक्य आहे.
* यामुळे खड्डे लवकर भरून वाहतूक लवकर सुरू होऊ शकते. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे एम 60 काँक्रीट वापरून खड्डा भरता येऊ शकेल.
* खड्डे भरणी मजबूत होईपर्यंत त्यावर पोलादी फळी (स्टील प्लेट) टाकावी जेणेकरून वाहतूक सुरळीत राहू शकेल.
* अशा प्रकारची खड्डे भरणी किमान तीन ते चार महिने टिकू शकते. फ्लाय ऍश अर्थात राखेपासून बनविलेल्या ब्लॉकचादेखील यामध्ये उपयोग करता येईल.