शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी शासनाने काढला आज नवीन शासन निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने | बुलढाणा

शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षणाबाबत शालेय शिक्षण विभागाने आज २१ डिसेंबर रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.  बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकार अधिनियम, २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे असून हे शिक्षण देण्याची जबाबदारी विभागातील सर्व घटकांची आहे.

राज्यातील १०० टक्के मुले शिकण्याच्या दृष्टीने शासन पातळीवर विविध शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार ८ जून २०१७ व २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व शिक्षक प्रशिक्षित होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. या शासन निर्णयान्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील पुर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या सुधारित कार्यपद्धतीस मान्यता दिलेली आहे. तथापि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पुर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी प्रशिक्षणांचा कालावधी निश्चि करुन ती प्रशिक्षणे ग्राह्या धरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आज २१ डिसेंबर रोजी शासन निर्णय काढून त्यामध्ये म्हटले आहे की, येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे प्रतिवर्षी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत तसेच विद्या प्राधिकरण मार्फत आयोजित खाली नमूद प्रशिक्षण शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. राज्य मंडळ, पुणे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत ज्या शिक्षकांनी सेवांतर्गत प्रशिक्षणे घेतली आहे व समाधानकारकरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या शिक्षकांचे प्रशिक्षण वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावीत असे शासन निर्णयात म्हटले आहे.

तर सन २०१८-१९ या वर्षापासून वरिष्ठश्रेणी करितता (१२ वर्ष) १० दिवसांचे प्रशिक्षण व निवडश्रेणी करिता (२४ वर्ष) प्रत्येक वर्षी १० दिवसांचे प्रशिक्षण याप्रमाणे सलग ४ वर्षात ४० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल. सदर १० दिवसाचे प्रशिक्षण हे शिक्षकांना ज्या वर्षात १२ वर्ष पुर्ण होणार आहेत त्या पूर्वीच्या कोणत्याही ३ पैकी २ वर्षात पूर्ण केलेली असावी, तसेच ४० दिवसांचे प्रशिक्षण हे शिक्षकांना ज्यावर्षी २४ वर्ष पूर्ण होणार आहेत त्या पूर्वीच्या ५ वर्षांपैकी ४ वर्षात पूर्ण केलेले असावे. असे नवीन आदेशात म्हटले आहे.