तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्णांना डिप्लोमा इंजिनीयरिंगच्या दुसऱया वर्षाला थेट प्रवेश; सीमाक्षेत्रातील उमेदवार, कश्मिरी हिंदूंनाही मिळणार प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिप्लोमा इंजिनीयरिंगच्या थेट दुसऱया वर्षाला देण्यात येणाऱया प्रवेशासाठी पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. आता बारावीमध्ये निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळेल.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयांसह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असावे अशी प्रवेशाची अट होती. ती यंदापासून बदलण्यात आली आहे. बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, इन्फर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनीयरिंगच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

कश्मिरी हिंदूंसाठी राखीव जागा

डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवणाऱया शिक्षण संस्थांमध्ये कश्मिरी विस्थापितांबरोबरच सध्या कश्मीरमध्ये राहत असलेल्या कश्मिरी पंडित व हिंदू कुटुंबांतील मुलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. केवळ त्यांना अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनीयरिंगसाठी प्रवेश अर्ज भरताना ‘उमेदवार विवादित सीमा क्षेत्रामधील आहे’ असा उल्लेख असलेले प्रमाणपत्र जोडावे लागत होते. ते कर्नाटकमधून मिळवताना त्यांना ‘विवादित’ शब्दामुळे अडचणी येत होत्या. राज्य सरकारने हा ‘विवादित’ शब्दच वगळला असल्याने सीमाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सोपे होणार आहे.