
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा-2020 साठी सुरक्षेच्या कडक उपाययोजना केल्या आहेत. देशातील 72 शहरांमधील 2569 केंद्रांवर उद्या रविवार, 4 ऑक्टोबर रोजी होणाऱया या परीक्षेला मास्क घातल्याशिवाय उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही असे यूपीएससीने म्हटले आहे.
या वर्षी देशातील 10 लाख 58 हजार उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीने परीक्षेसाठी पुढील गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.
मास्क घातल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.
परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेशासाठी देण्यात आलेले प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आणावे. अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही.
उत्तरपत्रिकेच्या ओएमआर शीटस्साठी विद्यार्थ्यांनी फक्त काळ्या शाईच्या बॉलपेनाचाच वापर करावा.
विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत स्वतःची सॅनिटायझरची बाटली आणावी.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
परीक्षा केंद्रात मोबाईल फोन आणू नयेत.
लोकलमधून प्रवासाची परवानगी
मध्य आणि पश्चिम रेल्वेने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत परीक्षा केंद्रापर्यंत लोकलमधून प्रवास करण्याची मूभा दिली आहे. यूपीएसएसीचे सचिव यांनी रेल्वे मंत्रालयाला केलेल्या विनंतीनुसार ही परवानगी देण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. यूपीएसएसीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे लेटर आणि ओळखपत्र रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी स्टेशन अधिकाऱयांना दाखवावे. त्यांच्यासाठी रेल्वे स्थानकांत अतिरिक्त तिकीट खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.


























































