
1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे. या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी)ने काही दिवसांपूर्वीच नवीन आयकर नियम जाहीर केले आहेत. नव्या कायद्यानुसार, आता क्रेडिट कार्डनेही इन्कम टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 असणार आहे. कर भरण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी मजकूर आणि फॉर्ममध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.
आर्थिक वर्षात एकूण 10 लाखांपेक्षा रोख रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. याआधी 50 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्ड जमा करावे लागत होते. नव्या कायद्यानुसार, पाच लाख रुपयांवरील वाहन खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटची बिले, बँक्वेट हॉल किंवा इव्हेंट मॅनेजमेंटसाठी 1 लाखांपेक्षा जास्त पेमेंटसाठी पॅनकार्ड लागेल. 50 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेच्या हस्तांतरणावर टीडीएस लागू होईल.
एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यास त्याला मागील कंपनीत कोणती कर प्रणाली होती, याची माहिती द्यावी लागेल. पगारदार कर्मचारी किंवा पेन्शनधारकांसाठी आता फॉर्म 16 ऐवजी फॉर्म 130 असेल. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱया सुविधांचा तपशील आता फॉर्म 123 मध्ये असेल जो फॉर्म 130 शी डिजिटल पद्धतीने लिंक केलेला असेल.


























































