मान्सूनची नवी चाल; मुंबईमार्गे गुजरात गाठले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लवकर येणार…लवकर येणार म्हणत हवामान खात्याने मान्सूनची आनंदवार्ता दिली, पण प्रत्यक्षात मान्सून कर्नाटकातच 11 दिवस रेंगाळला. पुढच्या प्रवासातही त्याने नवी चाल खेळली आहे. एक टोक कर्नाटकात फसले असताना दुसऱया टोकाने वेगाने मुंबईमार्गे गुजरात गाठले आहे. मध्य प्रदेशच्या दक्षिणेकडील राज्ये मात्र आसुसलेलीच असून उत्तरेकडेही आणखी दोन-तीन दिवस उष्णतेची लाट असणार आहे.

मान्सून सामान्यतः 15 जूनला निम्म्याहून अधिक हिंदुस्थान व्यापतो. यंदा अंदमानच्या समुद्रात सहा दिवस आधीच दाखल होऊनही मान्सून रडतखडत वाटचाल करीत आहे. मान्सूनने आतापर्यंत फक्त केरळ व्यापले आहे. मागील अनेक दशकांतील आकडेवारीचा विचार करता मान्सून ज्यावेळी गुजरातला पोहोचतो त्यावेळी मध्य प्रदेशच्या दक्षिणेकडील सर्व राज्यांत मान्सूनने जोरदार एण्ट्री मारलेली असते. 12 जूनपर्यंत आंध्र, तामीळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र व निम्मे छत्तीसगढ या भागांत मान्सून व्यापलेला असतो. यंदा मान्सूनने नवी चाल खेळत या राज्यांना ओढ लावली आहे. मान्सूनचा मूड अचानक बदलल्याने दक्षिणेकडील राज्यांतील बळीराजा चिंतेत आहेत.

मुंबई शहरात दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यानंतर लगेच मान्सून मुंबईत दाखल झाला, परंतु त्याने मुंबई पार करून थेट गुजरातची हद्द गाठली. मुंबईतील हजेरीमुळे मध्य प्रदेशात आर्द्रता वाढली आहे. महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत द्रोणिका तयार झाली आहे, असे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी रविवारी सांगितले.

महाराष्ट्रापासून यूपीपर्यंत… हवामानाचा अंदाज

  • सध्या वाऱयाचा वेग वाढत असून मान्सून वेगाने पुढे सरकेल. त्यामुळे पुढील तीन दिवसांत महाराष्ट्र आणि मध्य हिंदुस्थानात वादळी पाऊस पडेल. त्यामुळे तापमानात मोठी घट होईल.
  • ईशान्येकडे हिमालय आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण आणि ईशान्येकडील राज्ये वगळता देशाच्या उर्वरित भागांत पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे.
  • पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू

संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंप्री येथे दुपारी दीड वाजता वीज पडल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात शेळीसाठी झाडाचा पाला आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांच्या अंगावर वीज पडली. यात  रोहनसिंग किजयसिंग शिंदे (15) व रवी जनार्दन कळसकर (21) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कन्नड तालुक्यातील नागदजवळील बेलखेडा येथे रविवारी  दादाभाऊ पवार यांच्या शेतात वीज पडून महिला व शेतमजूर गंभीर जखमी झाला. लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दुधाबाई हनुमंत चव्हाण यांच्या तीन गायी व एक म्हैस तर डोंगरगाव तांडा येथे गोविंद कंटीराम चव्हाण यांच्या शेतात बांधलेले दोन बैल वीज पडून दगावले. हिमायतनगर तालुक्यात दुधड येथील शेतकरी पांडुरंग सूर्यवंशी यांच्या शेतात वीज पडल्याने शेतात असलेला बैल जागीच ठार झाला. हिमायतनगर शहरानजीक असलेल्या वाशीकर यांच्या शेतशिवारात एका झाडावर वीज कोसळून तरुण शेतकरी सुरेश परमेश्वर टोमके (30) याचे अंग भाजल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.