
सामना प्रतिनिधी। नवी मुंबई
ऐरोली येथील सेक्टर 10 च्या खाडीकिनारी बुधवारी पुन्हा सोनेरी रंगाचा कोल्हा सापडला. कुत्र्यांच्या भीतीमुळे हा कोल्हा या ठिकाणी दडून बसला होता. मात्र त्याची पुनर्वसू संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुटका करून त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले. याच भागात एप्रिलमध्ये एका कोह्याची विहिरीतून सुटका करण्यात आली होती. अडीच महिन्यांनंतर पुन्हा एक कोल्हा आढळून आल्यामुळे नागरिकांचे कुतूहल वाढले आहे.
सेक्टर 10 मध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ हा कोल्हा फिरत असताना काही नागरिकांनी पाहिला. त्यानंतर पुनर्वसू संस्थेचे अमर गुरूंग, सुरेश खरात, संजय रणपिसे, गणेश गोपाळे यांनी या कोह्याला पकडले. खाडीकिनारा असल्यामुळे या भागात नेहमीच कोल्हे येतात. हा कोल्हाही या ठिकाणी भटकत आला होता. मात्र या भागातील कुत्र्यांच्या भीतीमुळे त्याला परत जाता आले नाही. अडकून पडल्यामुळे त्याची उपासमार झाली. त्याच्या प्रकृतीवरही परिणाम झाला. आता या कोह्याची सुटका करण्यात आली आहे. वनविभागाने या कोह्याची रवानगी मुलुंड येथील संस्थेत केली आहे.


































































