कॉलेज तरुणीचा पाठलाग करणारा रोडरोमिओ थेट गेला तुरुंगात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नवी मुंबई

ऐरोलीमधील एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱया रोडरोमिओला वाशी न्यायालयाने दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. याप्रकरणी 2014 मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पाच वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने या आरोपीला दोषी ठरवले आणि त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये केली. वाशी न्यायालयाने दिलेल्या या दणक्यामुळे महिला आणि मुलींची छेडछाड करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

ऐरोली येथील सेक्टर 17 मध्ये राहणारी एक तरुणी या भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिला रत्नघोष रंजवे (28) हा त्रास देत होता. सदर तरुणी घरातून निघाली की रंजवे हा तिचा आपल्या बुलेट मोटारसायकलवरून पाठलाग करत थेट कॉलेजच्या गेटपर्यंत जायचा. अनेक वेळा त्याने जबरदस्तीने या तरुणीबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याने आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. भररस्त्यात गाडी आडवी लावून या तरुणीला अडवण्यापर्यंत रंजवेची मजल गेली. महिनाभर रंजवेचा छळ सहन केल्यानंतर या तरुणींने हा प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यानंतर वडिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक ननवरे आणि त्यांच्या पथकाने या तरुणीच्या घरापासून ते कॉलेजपर्यंत सापळा रचला आणि तिला त्रास देणाऱया रंजवेला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याविरोधात वाशी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

भक्कम साक्ष पुरावे
या खटल्याची सुनावणी सुरू असताना सहाय्यक सरकारी वकील अमित यादव यांनी जोरदार युक्तिवाद केला. साक्ष आणि पुरावे भक्कम असल्यामुळे न्यायाधीश डी. ए. सरनायक यांनी रंजवे याला दोषी ठरवून त्याला दोन वर्षे तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात आरोपी पक्षातर्फे ऍड. ए. आर. शेख यांनी काम पाहिले.