
दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या ओमायक्रॉनने आता पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनपासून म्यूटेट झालेला उपपप्रकार म्हणजेच ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट इस्रायलमध्ये आढळला आहे. ओमायक्रॉनचा हा नवा व्हेरिएंट हिंदुस्थानात निर्माण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा व्हेरिएंट कॅनडा, डेन्मार्क, सिंगापूर,चीन आणि ऑस्टेलियातही आढळला आहे.
ओमायक्रॉनच्या या नव्या प्रकाराला BA2 असे नाव देण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या जिनोम स्विक्वेसिंगदरम्यान हा नवा प्रकार आढळला आहे. या प्रकारात ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटमध्ये अनेक म्यूटेशन झाल्याने तो तयार झाला आहे. तसेच तो ओमायक्रॉनपेक्षा जास्त संक्रामक आणि घातक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
BA2 या नव्या प्रकारच्या धोक्यांचा अद्याप निश्चित अंदाज आलेला नाही. मात्र, अद्याप आढळलेल्या रुग्णांमध्ये या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनपेक्षा वेगळी लक्षणे किंवा आजार आढळले नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. BA2 काही आठवड्यांपूर्वी चीनमध्ये प्रथम आढळला होता. त्याचे म्युटेशन आणि निर्मिती हिंदुस्थानात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हिंदुस्थानसह हा व्हेरिएंट डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि सिंगापूरमध्येही आढळून आला आहे, असे वृत्त ‘कान’ने दिले आहे.
ओमायक्रॉनमध्ये झालेल्या या म्युटेशनने संशोधकांचीही चिंता वाढवली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये इस्रायलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ओमयक्रॉन आणि कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. इस्रायलमध्ये दररोज 12 हजार नवे रुग्ण आढळत होते. ती संख्या आता 48 हजारावर गेली आहे. मात्र, प्रत्यक्षात संसर्ग झालेल्यांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या मर्यादीत आहे. त्यात मोठी वाढ झालेली नाही. गेल्या आठवड्यात 136 गंभीर रुग्ण होते. या आठवड्यात ती संख्या 283 झाली आहे. सात दिवसांमध्ये 284 रुग्ण गंभीर असल्याचे दिसून आले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात 189 % वाढ झाली आहे. गंभीर रुग्णांची संख्या मर्यादीत असल्याने याआधीच्या लाटेपेक्षा आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.
आता ओमायक्रॉनच्या BA2 या नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. हा नवीन प्रकार ओमायक्रॉनपेक्षा जास्त संक्रामक आणि घातक असेल तर रुग्णसंख्येत वाढ होण्यास गंभीर रुग्णांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. त्यावर नव्या प्रकारावर आणि त्यात झालेल्या म्यूटेशनबाबत इस्त्रायल आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांक लक्ष ठेवत असून त्याच्या घातकतेचा अंदाज घेतला जात आहे.





























































