नवपालकत्व एक अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

स्त्रीला मातृत्वाची जाणीव झाली की जशी हरखून जाते तशीच जबाबदारही बनते. आईच्या भूमिकेसाठी सज्ज होते. या मातृत्वाप्रमाणेच पितृत्वाची जबाबदारी घेण्यासही होणारा बाबा स्वतःला तयार करत असतो. आपण अधिक सक्षम झालं पाहिजे या विचाराने सगळ्या गोष्टींची जास्त काळजी दोघांकडून घेतली जाते. इथूनच पुढे काही महत्त्वाच्या मानसिक समस्यांना सुरुवात होते. प्रसूतीनंतर या समस्या अधिक बळावतात. प्रसूतीनंतर येणारा ताण वा नैराश्य अशाच काही मानसिक समस्यांपैकी एक असते.

मातृत्व… स्त्रीला लाभलेली अमूल्य देणगी. जेव्हा स्त्रीला मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आपसूकच तिच्यामध्ये शारीरिक तसेच मानसिक बदल घडून यायला सुरुवात होते. एरवी काहीशी अल्लड असणारी ती ‘मी आई होणार’ या जाणिवेनेच एकदम जबाबदार बनते. ‘आपण बाळाला आता जपायला हवं’ या एकाच विचाराने स्वतःला अधिकाधिक विश्रांतीही देण्याचा प्रयत्न करत असते. स्वतःचं काwतुक स्वतः करतेच, पण इतरांकडूनही करवून घेण्याची तिची इच्छा असते.
जसजसे तिचे दिवस भरत येत असतात; तसतसे ती स्वतःला ‘आई’ या नवीन भूमिकेसाठी सज्ज करत असते. तिच्या ‘आईपणाच्या आदर्श संकल्पना’ या इथूनच तयार व्हायला सुरुवात होत असते. ती स्वप्नरंजनात मग इतकी रमून जाते की, बऱयाचदा ‘मी माझ्या बाळासाठी सगळं काही करीन’ अशा प्रकारची स्वतःच स्वतःला वचनं तिच्याकडूनच दिली जातात.
जसे मातृत्व तसे पितृत्व! आपल्या बाळाच्या आगमनासाठी होणारे ‘बाबा’ही स्वतःला तयार करत असतात. आता आपण अधिक सक्षम झालं पाहिजे या विचाराने स्वतःच्या पत्नीला जपायला सुरुवात होते. सगळय़ा गोष्टींची जरा जास्तच काळजी दोघांकडून घेतली जाते आणि इथूनच पुढे मग काही महत्त्वाच्या मानसिक समस्यांना सुरुवात होते; ज्या प्रसूतीनंतर जास्त बळावतात.
ost-partum Stress/Depression” म्हणजेच ‘प्रसूतीनंतर येणारा ताण/नैराश्य’ ही महत्त्वाची मानसिक समस्या किंवा आजार हा यापैकीच एक.
अशीच समस्या मोहिनीला (नाव बदलले आहे) येत होती. तिची प्रसूती होऊन जवळपास चार महिने झाले होते. तरीही तिला तिच्या बाळाचं खूप दडपण यायचं. बाळ रडत असेल तर तिला नकोसं व्हायचं. बाळाचा खूप राग यायचा. मग अशावेळी ती चिडचिडी व्हायची, स्वतःही रडायची. बाळाला कधीकधी ती घ्यायचीच नाही. तिला तिच्या रागाची आणि अशा वागण्याची शरम वाटून ती उदासही व्हायची, ‘मी एक स्वार्थी आई आहे’ हा विचार तिच्या डोक्यात सारखा सारखा येत होता. तिची अन्नावरची वासना उडाली होतीच. तिचा उत्साह, आयुष्यातला रस जणू संपला होता. मनातली नकारात्मकता आणि हतबलता वाढत होती. तिची आणि बाळाची खोली जणू तिच्यासाठी कोठडी झाली होती.
मोहिनीची त्यामुळे तगमग खूप होत होती. तिच्या नवऱयाने मग समुपदेशन घेण्याचे ठरवले आणि तो तिला त्यासाठी घेऊन आला.
मोहिनीची ही अवस्था तिला ‘प्रसूतीनंतरचा ताण’ आल्याचे दर्शवत होती.
आज जवळपास बऱयाच नवीन माता या अवस्थेतून जात आहेत. प्रसूतीनंतर येणारा ताण/नैराश्य हे एका दिवसात येत नाही. आणि ते यायला काही कारणे आहेत.
प्रसूतीनंतर/गरोदरपणात होणारे शारीरिक बदल जे हॉर्मोन्समुळे होतात.
गरोदरपणाच्या काळात येणारा ताण
घरचे नकारात्मक वातावरण
नवरा-बायकोमध्ये असलेला बेबनाव
स्त्रीचा अतिविचार किंवा अतिचिंता असण्याचा स्वभाव
गरोदरपणात स्वतःची व्यवस्थित काळजी न घेणे
गरोदरपणात आणि बाळाची काळजी यावर मिळालेले चुकीचे आणि अवास्तवी सल्ले
शारीरिक समस्या

अशा अनेक कारणांमुळे स्त्रीला ह्या अवस्थेला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत कुठल्याही स्त्रीला या काळात फक्त आणि फक्त मानसिक आरामाची जास्त गरज असते; कारण तिच्या विचारांचा आणि भावनांचा सखोल परिणाम तिच्या वाढणाऱया बाळावर होत असतो.
जसे स्त्रियांना असे नैराश्य येऊ शकते तसेच नवीन पिता बनलेल्या पुरुषांनादेखील या अवस्थेचा सामना करावा लागू शकतो असे संशोधन सांगते.
नवपिता हे आपला ताण/नैराश्य चिडून किंवा रागाद्वारे व्यक्त करतात. काही वेळा ते स्वतःला बाळापासून दूर ठेवतात किंवा अनिच्छेनेच बाळाला सांभाळतात. काही वेळा अशा नवपित्यांमध्येही ‘मी वाईट बाबा आहे’ हा नकारात्मक विचार येतो. आणि कुठेही याबाबत न बोलल्यामुळे हा ताण वाढत जाऊन मद्यपानापर्यंत जाऊन पोहोचतो.
यासाठी अनेक मार्ग, उपाय आहेत. चौकटीतील अशा मार्गांचा अवलंब केल्यानंतरही हा ताण कमी होत नसेल तर अशावेळेस तज्ञांचे योग्य ते मार्गदर्शन घेतल्यास पुढील होणारे नकारात्मक परिणाम टळतात.
मोहिनी आणि तिचा नवरा हे याबाबतीत खूपच जागरूक होते. म्हणून त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगून तज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यानुसार काही गोष्टी सुरू केल्या.
मोहिनी विश्रांतीसाठी पुन्हा काही दिवस माहेरी गेली. जेव्हा तिला बाळाला सांभाळायचे दडपण यायचे तेव्हा ती इतरांची स्वतःहून न लाजता मदत घेत होती. स्वतःला वेळ देत होती. छंद तिने जोपासायला सुरुवात केली. मेडिटेशन सुरू केले.
या सर्वांचा चांगला परिणाम झाला. मोहिनीची बाळाबद्दलची भीती जाऊन त्याची जागा बाळाबद्दलच्या ममता आणि काळजीने घेतली. आता तिचे बाळ नऊ महिन्यांचे झालेय. मोहिनीने स्वतःच्या ऑफिसचेही काम करायला सुरुवात केलीय.

म्हणूनच प्रसूतीनंतरचा ताण/नैराश्य ही खचितच दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. हे सर्व लक्षात आल्यावर याच्या निराकरणासाठी उपाय मात्र निश्चितच आहेत. ते जाणून घेण्याअगोदर आपण काही महत्त्वाच्या गैरसमजांबद्दल विचार करूया.
1. प्रसूतीनंतरचा ताण/नैराश्य हे म्हणजे नाटक असते. – असे नसून अशी स्त्री (नवमाता) किंवा असा पुरुष (नवपिता) ‘मी ओके आहे’ असे भासवत असतात.
2. प्रसूतीनंतरचा ताण/नैराश्य म्हणजे केवळ आळशीपणा – असे नसून हा शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतराचा परिणाम असतो.
3. वैतागणे किंवा बाळावर राग म्हणजे बेजबाबदारपणा – असे नसून हे ताणतणाव अयोग्य रीतीने व्यक्त करण्याचे वर्तन असते.
म्हणूनच अशा समस्येवर मात करण्यासाठी योग्य तो सल्ला आणि समुपदेशन गरजेचे ठरते.
तसंच घरातील इतर सदस्यांनीसुद्धा काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
घरातील वातावरण शक्य तितके आनंदी ठेवणे. याचा अर्थ असा की, जर काही कौटुंबिक कलह असतील तर ते जास्त न ताणणे आणि शक्य असल्यास सामोपचाराने सोडवणे.
अशावेळेस नवमाता-पित्याला समजून घेण्याची आणि त्यांच्या मर्यादांसकट स्वीकारण्याची जास्त गरज असते. ती गरज ओळखून बाकी सदस्यांनी पुढाकार घेतला तर त्यांचा ताण हलका होऊ शकतो.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

[email protected]