भांडुप रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पूल

मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप स्थानकावर 6.00 मीटर रुंदीचा नवीन दक्षिण पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने पुलाचे काम केले आहे. या पुलामुळे भांडुपच्या रहिवाशांना पूर्व आणि पश्चिम अशी ये-जा करणे सोपे होणार आहे. तसेच ‘पीक अवर्स’ला प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यास पुलाची मदत होईल, असे एमआरव्हीसीने म्हटले आहे. हा पूल भांडुप रेल्वे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्म आणि स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला जोडणार आहे. पुलाची लांबी 66 मीटर आणि रुंदी 6 मीटर आहे. जवळपास सहा कोटी रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. हा नवीन पूल लवकरच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बांधकामाधीन 9.5 मीटर रुंदीच्या एलिव्हेटेड डेक आणि पूर्वेकडील बाजूस प्रस्तावित असलेल्या 5 मीटर रुंदीच्या स्कायवॉकला जोडला जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.