30 जूनपासून यूपीआयचा नवीन नियम, चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत

देशात सध्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यूपीआयवरून लाखो लोक दररोज पैशांची देवाण-घेवाण करत आहेत, परंतु कधी कधी एक छोटीसी चूक काहींना महागात पडते. काही वेळा चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यामुळे आता यूपीआयवरून चुकीच्या खात्यात पैसे जाऊ नये, यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने एक नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम देशभरात 30 जून 2025 पासून सर्व यूपीआय प्लॅटफॉर्म्सला लागू केला जाईल. म्हणजेच जे युजर्स गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम यासारखे यूपीआय अ‍ॅप्स वापरतात त्यांना हा नियम लागू होईल.

नव्या नियमानुसार, कोणतीही व्यक्ती यूपीआयद्वारे पैसे पाठवत असेल त्या वेळी त्याला केवळ कोर बँकिंग सिस्टम (सीबीएस) मधील नाव दिसेल. फोनमध्ये सेव्ह केलेल्या नावाच्या आधारावर पैसे पाठवता येणार नाहीत. बँक रेकॉर्ड्समधील खरे नाव ट्रान्झॅक्शच्या स्क्रीनवर दिसेल. यामुळे चुकीच्या नावावर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत.

हा नियम पीटूपी (पीअर टू पीअर) आणि पीटूपीएम (पीअर टू पीअर मर्चंट) ट्रान्झॅक्शन वर लागू होईल. याचा मुख्य उद्देश युजर्सला योग्य खाते धारकांचे नाव दिसणे हा आहे. जर चुकून पैसे पाठवले तर तत्काळ बँकेत जाऊन तक्रार करा. तसेच हेल्पलाइन 1800-120-17040 वर कॉल करा. एनपीसीआयच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार करू शकता.