5 राज्यांच्या निवडणुकांसाठी आयोगाची नवी नियमावली; खुल्या मैदानात प्रचारसभांना परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांतील प्रचारासाठी कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केले आहेत. आयोगाने ‘इनडोअर’साठी 50 टक्के क्षमतेने, तर खुल्या मैदानात 30 टक्के क्षमतेने प्रचारसभा घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र पदयात्रा, रोड शो आणि वाहन रॅलींवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

देशभरात ओमायक्रोनमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून पाच राज्यांतील प्रचारावर निर्बंध लागू करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत घसरण होऊ लागल्याने ते निर्बंध काही प्रमाणात शिथील करीत आयोगाने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता खुल्या मैदानात एकूण क्षमतेच्या 30 टक्के उपस्थितीत आणि बंद सभागृहात एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत प्रचारसभा घेता येणार आहेत.

घरोघरी प्रचारासाठी 20 लोकांचा सहभाग

घरोघरी प्रचारात जास्तीत जास्त 20 लोक सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत प्रचारावर असलेली बंदी ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहे. देशात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर व पंजाब या पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहे.