
पश्चिम रेल्वेने ‘हेडऑन जनरेशन’ नावाच्या नव्या तंत्रज्ञानामुळे नोव्हेंबर 2015 ते ऑक्टोबर 2019 या चार वर्षांत सुमारे 73 कोटी रुपये वाचविले आहेत. तसेच 13 हजार किलो लिटर इंधनात बचत करीत 39 हजार 392 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी केले आहे. पश्चिम रेल्वेने ओव्हरहेड वायरद्वारे मिळणाऱया 25 के.व्ही. विजेवर इंजिने चालवून त्याचद्वारे गाडीतील दिवे, पंखे, एसी अशी विद्युत उपकरणे चालवून ही इंधन बचत केली आहे. या आधी यासाठी गाडीला जनरेटरच्या दोन पॉवर ब्रेक व्हॅन जोडाव्या लागून वीजनिर्मितीवर इंधन खर्च होत होते.
2015 मध्ये, पश्चिम रेल्वेने ‘एण्ड ऑन जनरेशन’ ट्रेनचे रूपांतर ‘हेड.ऑन जनरेशन’ प्रणालीमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पश्चिम रेल्वेने थ्री फेजचे विजेवर धावणारे डब्ल्यूएपी -7 इंजिन बसविले आहे. यात पेन्टोग्राफपासून कोचपर्यंत वीज वाहून नेली जात असून त्याद्वारे गाडीतील सर्व वीज उपकरणे चालविली जात आहेत. पूर्वी डिझेल जनरेटर पॉवर ब्रेक व्हॅन जोडाव्या लागत होत्या आणि त्याद्वारे वीज, पंखे आणि एसी चालविल जात होते. नव्या ‘हेडऑन जनरेशन’ तंत्रज्ञानामुळे वीज ओव्हरहेड लाइनपासून थेट डब्यात जाते. या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेने 24 मेल -एक्सप्रेसमध्ये इलेक्ट्रिक सर्किट बदलले आहेत. त्यामुळे हवेच तसेच ध्वनिप्रदूषण कमी होते. तसेच हाय स्पीड डिझेलची बचत होऊन परकीय चलनात बचत होत आहे.
या वर्षअखेर सर्व गाडय़ांमध्ये ‘हेड ऑन जनरेशन’
पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये नोव्हेंबर 2015 मध्ये मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. त्यानंतर, पेरेक रेकमध्ये रूपांतर करण्याचे काम वेगाने केले गेले. या आर्थिक वर्षात सर्व गाडय़ांचे रूपांतर या तंत्रावर करण्याचे ध्येय पश्चिम रेल्वेने आखले आहे. यामुळे ऑक्टोबर 2019 पर्यंत 18.15 कोटी रुपयांची बचत झाली असून 2019- 2020 पर्यंत 38 कोटींची बचत होणार आहे.























































