पश्चिम रेल्वेचे 1 नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेवर 1 नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. त्यात प्रवाशांची मागणी पाहून फेऱयांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच काही सेवांचा विस्तार होणार आहे. हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आल्याने गोरेगाव स्थानकापर्यंत आणखी 20 फेऱया वाढविण्यात येणार आहेत.

पश्चिम आणि मध्य रेल्वे दरवर्षी लोकलचे नवीन वेळापत्रक जारी करते. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज 1355 फेऱया होत असून त्यात नव्या वेळापत्रकात दहाने वाढ होणार आहे. ही संख्या आता 1365 पर्यंत पोहोचणार आहे. सकाळच्या सुमारास चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱया लोकलचे चर्चगेट ते मुंबई सेंट्रलपर्यंतचे काही थांबे रद्द केले आहेत. त्यामुळे विरारकरांचा प्रवास वेगवान होणार आहे.

विरार ते डहाणू मार्गावर 42 फेऱयांचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच हार्बरवर अंधेरी ते गोरेगावपर्यंत 40 फेऱयांचा विस्तार होईल. सध्या हार्बरवर गोरेगाव ते सीएसएमटीपर्यंत 49 फेऱया चालवण्यात येत आहेत. सकाळच्या वेळेस चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱया जलद लोकलचे काही थांबे रद्द करण्यात येणार आहेत.

महिला विशेष लोकलचा विस्तार
सायंकाळी 6.51 ची महिला विशेष लोकल चर्चगेट ते भाईंदरपर्यंत जाते. तिचा विस्तार आता विरारपर्यंत होणार आहे. सकाळी 9.56 ची वसई ते चर्चगेट लोकल सकाळी 8.44 वाजता विरारहून सुटेल.

एसी लोकलला आणखी सात थांबे

एसी लोकलला मिळणाऱया कमी प्रतिसादामुळे त्यांना आणखी सात स्थानकांवर थांबे दिले जातील. त्यात नालासोपारा, नायगाव, मीरा रोड, दहिसर, ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड, मरीन लाइन्स स्थानकांचा समावेश आहे.

आता रेल्वे स्थानकांवर मंद आवाजात संगीत वाजणार

नेहमी कानीकपाळी पडणाऱया रेल्वेच्या सूचनांना कंटाळलेल्या रेल्वे प्रवाशांना आता सुमधुर आवाजातील मंद संगीत ऐकण्यास मिळणार आहे. हो… रेल्वेमंत्र्यांनी आता विमानतळाप्रमाणे अत्यंत मंद स्वरातील संगीत रेल्वे स्थानकांवर वाजविण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांची शुक्रवारी आढावा बैठक घेतली. त्यात विविध प्रकल्पांना लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. मोठय़ा स्थानकांऐवजी सर्वच स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा देण्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरांना जाण्यासाठीदेखील रेल्वेमार्गांवर विविध ठिकाणी सब-वे बांधण्यात यावेत.

मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेट यांचे नाव देण्यास तयार

हिंदुस्थानी रेल्वेची पायाभरणी करण्यास मोलाचे योगदान देणाऱया नाना शंकरशेट यांच्या स्मृतीनिमित्त पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसला त्यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने तसा प्रस्ताव पाठविल्यास त्यावर नक्की निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.