गुजरातमध्ये वाहन दंडाची रक्कम घटवली, गडकरींचा रुपाणींना खरमरीत सवाल

1570

देशभरात वाहतूकीचे नियम कडक केले जात असतानाच गुजरातमध्ये मात्र मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी नव्या मोटार वाहन कायद्यातंर्गत लागू करण्यात आलेल्या दंडाची रक्कम घटवली आहे. यावरून केंद्रीय मंत्री व रस्ते वाहतूक दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली असून दंडाची रक्कम कमी करण्यास माझी काही हरकत नाही. मात्र दरवर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या दीड लाख नागरिकांची चिंता नाही का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. बीएस- 6 तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या वाहनांच्या लॉचिंग कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

याबद्दल एएनआयने वृत्त दिले आहे. त्यानुसार गडकरी म्हणाले की नवीन मोटार वाहन कायदा ही काही महसूल उत्पन्न योजना नाहीये. पण तुम्हांला दरवर्षी रस्ते अपघातात होणाऱ्या दीड लाख नागरिकांच्या मृत्युची काळजी नाही का? राज्य सरकारने दंडाच्या किंमती कमी केल्या म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की लोकांना कायद्याचे ज्ञान नाही किंवा त्याचा धाक नाही.

दरम्यान नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाची रक्कम कमी करताना रुपाणी यांनी म्हटले होते की आम्ही नवीन नियमाच्या कलम 50 मध्ये बदल केला आहे. ज्यात दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्यानुसार दंडाची रक्कम 1000 रुपये आहे. पण गुजरातमध्ये हेल्मेट न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच विनापरवाना वाहन चालवणाऱ्याकडून विशेषत दुचाकी स्वाराकडून 5 हजार ऐवजी 2 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पण इतर वाहनांसाठी दंडाची रक्कम 3 हजार असेल असेही रुपाणी यांनी म्हटले होते.

तर वाहनावरील दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्यानंतर जनतेत नाराजीचा सूर उमटला होता. यावर बोलताना गडकरी म्हणाले होते की नवीन मोटार वाहन कायद्यातंर्गत वसूल केली जाणारी दंडाची रक्कम ही काही सरकारी तिजोरी भरण्यासाठी नाही. तर लोकांमध्ये वाहन नियमाप्रती जागरुकता वाढवण्यासाठी आहे. यामुळे नियम पाळा आणि दंडापासून दूर राहा.

आपली प्रतिक्रिया द्या