पंढरपूरमध्ये उभारले जातेय प्रति विठ्ठल-रखुमाई मंदिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतल्याने देवाची परंपरागत पूजाअर्चा करणाऱ्या बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींच्या हक्कांवर न्यायालयाने गदा आणली. तथापि, बडवे आणि उत्पात मंडळींनी देवाच्या प्रति असलेली भक्ती अन् रूढी-परंपरा जतन करण्यासाठी श्री विठ्ठल-रखुमाईचे प्रतिमंदिर उभारणीचे काम हाती घेतले आहे. येत्या 11 ऑक्टोबरला रुक्मिणीमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे तर कार्तिकी वारीपर्यंत श्री विठ्ठल मंदिर पूर्णत्वास येणार आहे.

श्री विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारींवरून शासनाने मंदिर ताब्यात घेऊन बडवे-उत्पात आणि सेवाधारी यांचे हक्क-अधिकार संपुष्टात आणले. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींनी 27 वर्षे लढा दिला, मात्र 15 जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने बडवे-उत्पात आणि सेवाधाऱ्यांचे हक्क मोडीत काढून मंदिर शासनाच्या ताब्यात दिले. या निर्णयानंतर शासनप्रणीत मंदिर समितीने देवाच्या पूजेसाठी बडवे-उत्पात, सेवाधारी यांपैकी कोणाचीही मदत न घेता पगारी लोक नियुक्त करून मंदिरातील परंपरागत धार्मिक विधी सुरू ठेवले. पगारी पुजाऱ्यांकडून देवाची सेवा व्यवस्थित होत नसल्याचे बडवे-उत्पात यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले, मात्र समितीने त्यांची दखल घेतली नाही. उलट बडवे-उत्पात यांच्या दैनंदिन दर्शनासह परंपरागत नैवेद्य आणि अन्य पूजाअर्चेवरही समितीने निर्बंध आणले.

अशा विविध कारणांनी दुखावलेल्या बडवे-उत्पात समाजाने दैनंदिन दर्शन, परंपरागत पूजाअर्चा करण्यासाठी स्वमालकीचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. श्री विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील काळा मारुती मंदिराजवळील उत्पात समाजाच्या वसिष्ठ आश्रम येथे श्री रुक्मिणीमातेचे मंदिर उभारले असून श्री विठ्ठल मंदिराचे काम बडवेवाडय़ात सुरू आहे.