कुडाळ बसस्थानकावरील घड्याळामुळे सौंदर्यात भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळ नगरपंचायत इमारतींवर पूर्वी घड्याळ बसविण्यात आले होते. त्यामुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडत होती. मात्र, नव्याने बांधण्यात आलेल्या नगरपंचायत इमारतींवर घड्याळे नव्हती. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी घड्याळांची संकल्पना पुन्हा मांडली. त्यांनी कुडाळ गांधीचौक येथील नवीन बसस्थानक इमारतीसाठी निधी मंजूर करून इमारतीच्या प्लॅनमध्ये दर्शनी भागावर घड्याळाचा समावेश केला.

या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या नव्या इमारतीवर शुक्रवारी घड्याळ झळकले आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. हे घड्याळ पन्नास ते साठ फूटांच्या उंचीवर असल्याने दुरुनही स्पष्ट दिसते. सुमारे 25 वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील एखाद्या इमारतीवर घड्याळ बसविण्यात आले आहे. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ वासियांना घड्याळाची भेट दिली आहे.

या घडाळ्यामुळे बसस्थानकाच्या सौंदर्यात भर पडत असून ते लक्षवेधी ठरत आहे. हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले असून येत्या आठवड्याभरात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याहस्ते खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बसस्थानकाचे उदघाटन करण्यात येणार आहे.