सोनी लिव होणार ‘फूल टाईट’

सामना ऑनलाईन । मुंबई

सोनी एन्टरटेन्मेंटचे सोनी लिव हे वेबचॅनल `फुल टाइट’ नावाची मराठी वेबसिरीज सादर करणार आहे. फुल टाइट या सात भागांच्या वास्तवदर्शी मालिकेचे दिग्दर्शन श्रीपाद पवार या तरुण दिग्दर्शकाने केले आहे तर विजय बारसे यांनी निर्मिती केली आहे. या वेबसिरीजमध्ये यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर यासारखे लोकप्रिय कलाकार आहेत, त्यांच्याबरोबर अक्षय केळकर, सायली साळुंखे, वनश्री जोशी आणि सुमुखी पेंडसे आदी कलाकारही काम करत आहेत.

मैत्री, प्रेम आणि पालकत्व अशा संकल्पनांना स्पर्श करणारी फुल टाइट ही मालिका विनोदी अंगाने जाणारी आहे. एक परफेक्ट कुटुंब दिसणाऱ्या या घरात आदीचे (अक्षय केळकर) त्याच्या पालकांशी (यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर) फारच विचित्र मुद्द्यांवरून वाद होत असतात. सगळं काही ठीक चाललेलं असताना, वडील आणि मुलगा एका संध्याकाळी एकत्र दारू घेतात आणि सगळं बिघडून जातं. आयुष्यातील वेडीवाकडी वळणं, उपरोधिक गोष्टी या सगळ्यांचा या सुंदर पटकथेत सुरेख मेळ साधण्यात आला आहे.

सोनी लिवची फुल टाइट ही दुसरी वेब सिरीज आहे, यापूर्वी `योलो – यू ओनली लिव वन्स’ या सिरीजला भरघोस प्रतिसाद लाभला होता. १८ जुलै रोजी सुरुवात होणारी नवी सिरीज दर बुधवारी इंग्रजी उपशीर्षकांसह सोनी लिववर पाहता येईल.