वृत्तवाहिनीच्या संपादकाला खंडणीखोरीप्रकरणी अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

वृत्तवाहिनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी कपडे व्यापाऱ्यांकडे खंडणी मागणाऱ्या संपादकाला अटक झाल्याने वृत्तविश्वात खळबळ उडाली आहे. या संपादकासोबत त्याच्या वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या ५ पत्रकारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांच्या विरोधात खंडणी मागितल्याबद्दल इतर चार पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बड्या कंपन्यांचे स्टीकर लावून कपडे विकणाऱ्या दुकानांचा ही टोळी सातत्याने शोध घेत होती आणि त्यांला लुटण्याचं काम करत होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

संतोष सिम्हा(वय-३४ वर्ष) असं या संपादकाचे नाव असून तो कर्नाटकातील प्रजाप्रतिनिधी या वृत्तवाहिनीचा संपादक आहे. अशोक कुमार (वय-३३ वर्ष), व्ही.के.महादेव (वय-२१ वर्ष),नवीन(वय-२१ वर्ष), राकेश गौडा (वय-२३ वर्ष) आणि ए.आनंद( वय-३४ वर्ष) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सगळेजण ‘प्रेस’ चा स्टीकर लावून शहरभर गाडीतून फिरायचे. सावज दिसलं की त्याच्या दुकानात घुसायचे आणि खंडणी दिली नाही तर मोठ्या ब्रँडचे स्टीकर लावून कपडे विकतो अशी बातमी तयार करून चॅनेलवर दाखवेन अशी धमकी द्यायचे. संतोषचा आधी प्रजाप्रतिनिधी नावाचं वृत्तपत्र होतं, ते बंद करून वृत्तवाहिनी राज्यभर सुरू करण्याचा संतोषचा इरादा होता. यासाठीच त्याला पैशांची गरज होती जी त्याने खंडणी मागून जमा करण्यास सुरूवात केली होती.