
सामना प्रतिनिधी । नागपूर
99 वे अ़भा़ मराठी नाट्यसंमेलन थाटात पार पडले़. आता शंभराव्या नाट्यसंमेलनाची नांदी वाजेल़. शंभरावे संमेलन राज्यातील शंभर ठिकाणी होईल़़ ते कसे करावे, याचा विचार नाट्यपरिषदेने करावे, अशी सूचना संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी केली़. रेशिमबाग येथे उभारण्यात आलेल्या कै़. राम गणेश गडकरी नगरीमध्ये 22 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अ़भा़ मराठी नाटयपरिषदेच्या 99व्या संमेलनाचा समारोप रविवारी करण्यात आला़. त्यावेळी, अध्यक्ष या नात्याने, गज्वी यांनी काही प्रमुख सूचना केल्या़. तत्पूर्वी, संमेलन उत्साहात पार पडल्याच्या अभिनंदनाचा ठराव त्यांनी सादर केला़. यावेळी, व्यासपीठावर डॉ. गिरीश गांधी, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष नवनाथ (प्रसाद) कांबळी, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, महापौर नंदा जिचकार उपस्थित होते़
समारोपीय भाषणात बोलताना गज्वी यांनी सहिष्णूता ही व्यवहारात आली तर बरे होईल, असे मत व्यक्त केले़. शहरी नक्षलवाद हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी उचलला आणि उत्तर दिले, तेव्हा तो तेथेच संपल्याचेही ते यावेळी म्हणाले़. 2013 साली पठारे समीतीने मराठी भाषेबाबतचा अहवाल केंद्राकडे पाठवला़ नाटक साहित्याचा प्रकार असून, कविता, कथा, कादंबऱ्यांच्या तुलनेत साहित्यात नाटकाचा वाटा मोठा आहे़. त्यामुळे, नाटकाच्या व्यासपीठावरून मराठी अभिजात भाषेचा मुद्दा उचलणे हे कर्तव्य समजतो़. केंद्राने त्या अहवालाकडे आजवर पाठ फिरवली. त्याचे कारण माहित नाही़. मात्र, आपण जर मराठीला अभिजात भाषा मानतो. तर आतापासून मराठी अभिजात भाषा दिन साजरा करण्याचे आवाहन गज्वी यांनी यावेळी केले़. त्याबाबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना लेखी पत्र पाठविणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले़.महाराष्ट्राला आणि एकूणच देशाला कलाच नाही, असे मत व्यक्त करत प्रेमानंद गज्ची यांनी महाराष्ट्रात कलादिन साजरा करण्याचे आवाहन यावेळी केले़.
समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार होते़. मात्र, अचानक पंजाबला जावे लागल्याने, ते येऊ शकले नाहीत़ तर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमालाच दांडी मारली़. संमेलनाच्या एकही दिवस ते नागपुरात फिरकलेच नाहीत़ पालकमत्री चंद्रशेखर बावनकुळे समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते़. मात्र, त्यांनीही दांडी मारली़ या लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्याची चर्चा गडकरी नगरी परिसरात सुरू होती़. मध्यवर्तीचे सदस्य सतीश लोटके यांनी यावेळी 98 व्या नाट्यसंमेलनानंतर निधन झालेल्या रंगकर्मींना आदरांजली वाहत त्यांच्यासाठी शोकप्रस्ताव सादर केला़ तर रंगभूमीशी निगडित सन्मानप्राप्त रंगकर्मींचा अभिनंदन ठराव यावेळी पारित केला़.
हौशी रंगकर्मींना थिएटर मिळावे!
नागपुरात हौशी नाट्यसंस्था खूप आहेत़. मात्र, त्यांना आधार नाही़ महापालिकेच्या शाळा तालमीसाठी मिळणे बंद झाले़. मुलांना तालमीसाठी जागा नाहीत़. त्यांच्यासाठी थिएटर उपलब्ध करून तालमीची सोयही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रेमानंद गज्वी यांनी केली.
शंभरावे नाट्यसंमेलन सांगलीत – प्रसाद कांबळी
शंभरावे नाट्य संमेलन सांगलीत होणार असल्याची घोषणा नाट्यपरिषदेच्या मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली़. स्वस्तात नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचा आणि नाट्यगृह सौरऊर्जेवर चालविण्याचा ‘नागपूर पँटर्न’ राज्यभरात चालवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली़





























































