पुढची वारी धुरमुक्त असेल, मुख्यमंत्र्यांचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे । पंढरपूर

‘स्वच्छ वारी निर्मळ वारी’ हा संकल्प घेऊन महाराष्ट्र्र शासनाने गेली चार वर्षे काम केले. या कामात समाधानकारक यश मिळाल्याने पुढची वारी ही धूर मुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे या पुढच्या वारीत कुठेही चूल न पेटविता गॅसवर स्वयंपाक होईल आणि गरजेनुसार गॅस उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यासन अधिकारी श्रीकांत भारती यांनी दिली.

निर्मल वारी अंतर्गत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाटण्यात येणाऱ्या रेनकोट उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज भारती पंढरपूर येथे आले होते. रेनकोट वाटपाविषयी अधिक माहिती देताना भारती म्हणाले, ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत वारकरी शेकडो मैलाचा प्रवास करुन पंढरीच्या वारीला चालत येत असतो. पालखी मार्गातील वारकऱ्यांना सर्वात जास्त त्रास होतो तो पावसाचा…पावसात भिजल्यामुळे आबालवृद्ध वारकऱ्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

वारकऱ्यांची ही गरज ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व:खर्चातून वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्याचा संकल्प केला. आणि राज्यभरातील शेकडो दिंड्या आणि पालख्यामधील साडे सहा लाख वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले.
हे रेनकोट गरजू वारकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्यात आली. बहुतांश वारकऱ्यांना हे रेनकोट मिळाल्याने वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत समाधान व्यक्त केले आहे.

wari-raincoat

चार वर्षांपूर्वी नैसर्गिक अस्वच्छता आणि दुर्घंधी मुक्त वारी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ वारी निर्मल वारी करण्याचा संकल्प केला होता या योजने अंतर्गत हजारो तात्पुरती आणि कायम शौचालये उभारण्याचे काम केले.
या उपक्रमास वारकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आज वारी निर्मल झाल्याचे पाह्यला मिळते.

या यशानंतर आता पुढची वारी ही धूर मुक्त असेल, कोणताही वारकरी अन्न शिजविण्यासाठी लाकूड किंव्हा रॉकेलचा वापर करणार नाही. यापुढे प्रत्येक वारकऱ्याचा स्वयंपाक हा गॅसवर असेल आणि मागणी नुसार गॅस उपलब्ध करून देण्याचे शासनाचे नियोजन असणार आहे.

या नव्या संकल्पनेमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि चूल पेटविणाऱ्या मातामाऊलीच्या डोळ्याला धुराचा त्रास होणार नाही.
येत्या कार्तिकी वारीमध्ये या संकल्पाची सुरुवात केली जाईल अशी माहिती भारती यांनी दिली याप्रसंगी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, निर्मलवारीचे संयोजक संदीप जाधव उपस्थित होते.