महत्वाकांक्षी न्हावा-शिवडी सागरी सेतूच्या कामाला सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

मुंबईतील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी अशा न्हावा शिवडी सागरी सेतू उभारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. उरण, पनवेल तसेच रायगडच्या विकासाला चालना देणाऱ्या न्हावा-शिवडी सि लिंकचे काम सध्या प्रगतीपथावर असून या सि लिंकसाठी मोठ्या प्रमाणात खारफुटी तोडण्यास सुरूवात झाली आहे. न्हावाखाडी, शिवाजीनगर तसेच गव्हाण परिसरातील सुमारे ४६ हेक्टर खारफुटीची यासाठी कत्तल करण्यात येणार आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई पारबंदर प्रकल्प (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) शिवडी-न्हावा हा सी-लिक उभारला जात आहे. हिंदुस्थानातील सर्वात मोठा २१.८ किलोमिटरचा पुल येथ उभारला जाणार आहे. हा पुल समुद्रात शिवडी ते न्हावा १६.५ कि.मी अंतर आणि पुढे न्हावा गावापासून चिर्ले गावापर्यंत साडे पाच किलोमिटर जमिनीवर असणार आहे. या पुलाची रूंदी २७ मिटर (८९ फुट) तर उंची २५ मिटर (८२ फुट) असणार आहे. या पुलावर वाहनांसाठी ६ लेन ठेवण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी गव्हाण, जासई आणि चिर्ले या गावातील शेतकऱ्यांची सुमारे ३७ हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे. अतिशय महत्वकांक्षी असणाऱ्या या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक(MTHL) प्रकल्पानुसार मुंबईच्या इस्टर्न फ्री-वे मार्गावरून शिवडी येथून हा पुल उभारला जाणार असून शिवडी येथे वाहनांना मार्ग बदलण्यासाठी इंटरचेंज आहे तर दुसरा इंटर चेंज चिर्ले जवळ असून हा पुल चिर्ले येथिल एनएच-४ बी ला जोडला जाणार आहे. तेथून मुंबईकडून येणारी वाहने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी, पुणे द्रुतगती मार्ग, जेएनपीटी तसेच प्रस्तावित विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडोरला जोडण्यात येणमार आहे या मार्गामुळे मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा हे अंतर सुमारे १५ किलोमिटरने कमी होणार असल्याने हा सी-लिंक अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

या पुलासाठी १४ हजार २६२ कोटी रूपये (२.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात येणार असून साडेचार वर्षात या पुलाचे काम पुर्ण अपेक्षित आहे. या चार वर्षात या पुलाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. जपानची जायका(JICA) कंपनीकडून ८० टक्के अर्थसहाय्य(कर्ज) दिले जाणार आहे. या पुलासाठी एल एण्ड टी आणि जपानची आयएचआय कॉर्पोरेशन हे संयुक्तपणे आणि टाटा प्रोजेक्टस कंपनी आणि देवू कंपनी संयुक्तपणे काम करणार आहेत. एल एण्ड टी या पुलापैकी १०.३८ किलोमिटर तर टाटा आणि देवू कंपनी ७.८०७ कि.मी काम करणार आहेत.

सध्या या पुलाच्या पायलिंगचे आणि खारफुटी तोडण्याचे काम सुरू झाले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील गव्हाण विभागातील ३७.२७५४ हेक्टर कांदळवन, तर १ हेक्टरपेक्षा जास्त संरक्षित वन, जासई उरण येथिल ५.५ हेक्टर संरक्षि वन तर जासई येथिल १.५ हेक्टर जमिनीवरली पुनस्थापित वन, चिरले येथिल .४४ हेक्टर वरील संरक्षित वन तर शिवडी येथिल १.३० हेक्टर क्षेत्रावरील कांदळवन तोडण्यात येणार आहे. या पुलासाठी ४७.४१७ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवन तोडण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या सिलिंकसाठी गव्हाण, जासई. चिर्ले गावातील शेतकऱ्यांच्या ३७ हेक्टर जमिन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात हा अत्यंत महत्वकांक्षी सागरी सेतू प्रण होणार आहे. या पुलामुळे पनवेल तसेच पुणे व गोवा येथिल अंतर १५ किलोमिटरने कमी होणार आहे. या पुलामुळे रायगड जिल्हा खऱ्या अर्थाने मुंबईशी जोडला जाणार आहे. या पुलामुळे उरण व पनवले वरून काही मिनिटात मुंबईला पोहचता येणार आहे. त्यामुळे उरण तसेच पनवेल परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव मिळणार आहे.