
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
उरण तालुक्यातील कोप्रोली येथिल ऑलकार्गो सिएफएस मधील कामगारांना कामावर घ्यावे यासाठी श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी बुधवारी कंपनीवर धडक देऊन कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले आणि कंपनीत जाणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प केली. सकाळी 11 वाजल्या पासून कंपनीची नाकाबंदी केल्यामुळे हादरलेल्या प्रशासनाने पोलिसांच्या मध्यस्थीने कामगारांशी चर्चा सुरू केली आहे.
जुन 2017 ला कोणतेही कारण न देता या कंपनीत काम करणाऱ्या 131 कामगारांना कामावरून कमी केले होते. सर्व पक्षियांनी व कामगारांनी अनेक वेळा आंदोलने करून देखील मुजोर प्रशासनाने फक्त आश्वासने देऊन कामगारांची आंदोलने मागे घेण्यास भाग पाडले. या काढलेल्या कामगारांमध्ये बहुसंख्य 94 कामगार हे प्रकल्पग्रस्त आहेत. या ठिकाणी ही कंपनी उभारण्यासाठी येथील लोकांनी आपल्या करोडो रूपये किंमतीच्या जमिनी कवडीमोलाने या कंपनीला दिल्या. आपल्या मुलांना, नातेवाईकांना या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील या आशेने या जमिनी कंपनीलास्वस्तात दिल्या होत्या. मात्र कंपनीच्या मालकांनी जून 2017 मध्ये कंपनीतील 131 कामगारांना कामावरून कमी केले. यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र जवळ जवळ 1 वर्ष 8 महिने झाले तरी या कामगारांना आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. एवढे दिवस नोकरी नसल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे संतापलेल्या आत्ता या कामगारांनी आरपार लढाई करण्याचे ठरविले असून त्यांनी कंपनीचे गेट बंद करून नाकाबंदी करून कंपनी प्रशासनाला जेरीस आणण्याचे धोरण आखले आहे. त्या अनुषंगानेच आज कामगार व त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या दिला होता. यावेळी शेकापचे सुरेश पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, बाजिराव परदेशी, माजी. जि.प. सदस्य वैजनाथ ठाकुर, विनोद म्हात्रे, जीवन गावंड, पंचायत समिती सदस्या शुभांगी पाटील, तालुका संघटक बी.एन. डाकी, आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

































































