चिरनेर खून प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्हावाशेवामधील चिरनेर-रानसई मार्गावर एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. या खून प्रकरणी मंगळवारी आणखी एका आरोपीला उरण पोलिसांनी अटक केली आहे. समीर उर्फ काल्या महम्मद शेख  असे या आरोपीचे नाव आहे.

या खून प्रकरणी अद्याप पर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. समीर उर्फ काल्या शेख यांच्या रिक्षातून सर्व आरोपी घटनास्थळी आले होते. समीर याच्या समोरच कल्पना उर्फ जया घाणेकर हीचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी समीर याला पोलिसांपासून खूनाची माहिती लपवून ठेवणे आणि आरोपींना मदत केल्या प्रकरणी अटक केली आहे. सवती- सवतींच्या मत्सरामुळेच नवर्‍याच्या पहिल्या बायकोने मुलीच्या प्रियकर हसन शेख आणि रिक्षावाला समीर शेख याच्या मदतीने हा खून केला होता.  खूनाच्या ठिकाणी कोणताही धागादोरा नसताना आणि खून झालेल्या महिलेची कोणतीही ओळख नसताना उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगदिश कुलकर्णी आणि उरण पोलीस टिमने अत्यंत शिताफिने तपास करत अवघ्या अठरा तासांत या खूनाचा छडा लावला.
या खून प्रकरणातील तबस्सूम मुख्तार अली (42) नुख्सार मुक्तार अली (21) आणि हसन शेख (24) हे आरोपी अटक आहेत. मंगळवारी समीर शेख या रिक्षाचालकाला अटक केली आहे तो सध्या पोलिस कोठडीत आहे.