
सामना ऑनलाईन । चेन्नई
हिंदुस्थानविरोधात अघोषित युध्द करण्याची योजना आखणाऱ्या दहशतवादी संघटना अन्सारउल्लाच्या तामीळनाडूतील 16 ठिकांणावर एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये एनआयएला अनेक घातपाती कारवायांबाबतचे दस्तावेज सापडले आहेत. त्यामुळे घातपाताचा मोठा कट उघडकीस आणण्यात एनआयएला मोठे यश मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी एनआयएने अन्सार उल्लाच्या 14 संशयितांना अटक केली होती. त्यातून या दहशतवादी संघटनेच्या घातपाती कारवायांची माहिती तपास संस्थेला मिळाली होती.
या संघटनेचे इसिस आणि अल कायदाशी संबंध असून हिंदुस्थानविरोधात अघोषीत युद्ध पुकारणे, देशभरात घातपाती कारवाया करून हिंदुस्थानला इस्लामिक देश बनवून शरीयत कायदा लागू करणे यासाठी ही दहशतवादी संघटना कार्यरत होती. अटक केलेल्या संशयितांची एनआयएकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या छाप्यात 9 मोबाईल, 15 सिमकार्ड, 7 मेमरी कार्ड, 3 लॅपटॉप, 5हार्ड डिस्क,6 पेन ड्राइव्ह, 2 टॅबलेटसह तीन सीडी आणि डीव्हीडी जप्त केल्या आहेत.तसेच मॅगजीन, बॅनर्स, नोटीस, पोस्टर्स आणि पुस्तकेही जप्त केली आहेत.
हिंदुस्थानला इस्लामिक राष्ट्र बनवून देशात शरीयत कायदा लागू करण्याचा या दहशतवादी संस्थेचा इरादा होता. त्याचप्रमाणे ही दहशतवादी संघटना देशभरात घातपाती कारवायांचा कट आखत होती. देशभारत गर्दीची ठिकाणी हेरून चाकून किंवा वाहनाने घातपाती कारवायांचा संस्थेचा कट होता. त्याचप्रमाणे मोठ्या शहरांना पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी विष मिसळण्याचा त्यांचा कट असल्याचे उघडकीस आले आहे. अन्सार उल्ला म्हणजे अल्लाचे समर्थक ही संघटना येमेनमधील अन्सार उल्लाशी संबधित आहे. या संघटनेने क्रूरपणे हत्याकांड घडवले आहेत. या संघटनेचा इसिस आणि अल कायदाशीची संबंध आहे.
ही दहशतवादी संघटना देशभरात विविध नावांनी सक्रीय आहे. एनआयएने गुन्हे दाखल केलेले संशयित चेन्नई आणि नागपट्टीनममधील आहेत. ही संघटना वहादत ए इस्लाम, जिहादिस्ट इस्लामिक युनिट, जमात वहादत ए इस्लाम, अल जिहादिया या नावाने सक्रीय आहे. बंदी असलेल्या सिमी संघटनेशीही या संस्थेचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिहादी विचारधारेचे व्हिडिओ व्हायरल करून ही संस्था तरुणांना दहशतवादी कारवायाकडे ओढत असल्याची माहितीही मिळाली आहे.



























































