
विश्वविजेता दोम्माराजू गुकेशला यंदाच्या सुपर रेपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अखेरपर्यंत झुंज देऊनही त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे अमेरिकेच्या हान्स मोके नीमनने निर्णायक क्षणी अचूक डावपेच रचत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
‘ग्रॅण्ड चेस टूर’मधील या स्पर्धेत नीमनने शेवटच्या दोन फेऱयांत सलग विजय मिळवत किताबावर आपली मोहोर उमटवली. नीमनने एकूण 22.5 गुणांसह स्पर्धेचा शेवट केला. विजेतेपदासोबत त्याने 50 हजार डॉलर्सचे बक्षीसही खिशात घातले. अखेरच्या फेरीत त्याने पोलॅण्डच्या राडोस्लाव व्हॉइटाशेकचा पराभव करत विजेतेपद निश्चित केले. त्याआधी सर्वात कमी वयात विश्वविजेतेपद जिंकणाऱया गुकेशकडून मोठय़ा अपेक्षा होत्या, मात्र त्याचा खेळ सातत्यपूर्ण झाला नाही. 36 संभाव्य गुणांपैकी त्याला केवळ 17 गुण मिळवता आले. स्पर्धेत गुकेशने रेपिडमध्ये नऊ आणि ब्लिट्झमध्ये आठ गुण कमावले.




























































