
मंगळवारी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेच्या वतीने निफाड शहरातून रॅली काढली. या रॅलीदरम्यान जोरदार शक्तिप्रदर्शन करीत कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निफाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा रंग कसा कसा वाढत जातो याकडे निफाडकरांचे लक्ष लागले आहे
शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार अनिल कदम यांनी निफाड उपबाजार येथून मोठय़ा संख्येने रॅली काढली. ही रॅली निफाड तहसील येथे आल्यानंतर शिवाजी चौकात सभा घेण्यात आली. या सभेत राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार भारती पवार, आमदार अनिल कदम, आमदार आमदार राजाभाऊ वाजे, आमदार किशोर दराडे, भाजपा नेते सुरेशबाबा पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, भास्कर बनकर, रवींद्र जाधव, अनिल कुंदे, सतीश मोरे, बापू पाटील यांची भाषणे झाली. या सभेनंतर आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेतर्फे आपली दोन नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्याकडे दाखल केली. याप्रसंगी मंत्री दादा भुसे, खासदार भारती पवार, सुरेश बाबा पाटील, भास्कर बनकर, दिलीप मोरे, अनिल कुंदे, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते. तर अनिल कदम यांच्या पत्नी वैशाली कदम यांनी शिवसेनेतर्फे नामनिर्देशनपत्र दाखल केले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, निफाड पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी व पोलीस कर्मचारी यांनी तहसील परिसरात चोख बंदोबस्त ठेवला.























































