
हर्बल ऑईल व्यवसायाच्या आमिषाने महिलेला तब्बल 21 लाख 12 हजारांचा गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला आर्थिंक व सायबर विभागाने मुंबईतून अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, 5 आईलच्या बाटल्या, 16 मोबाईल, 30 हजारांची रोकड, डेबिट कार्ड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राधा नेल्सन कॅस्टन (वय 37, रा. जुहू, मुंबई), अलेक्स अरिंझे, गुईडे फ्रॅन्सिस, ओकोको नवामामाह, काळू इलेचुक्यू (सर्व रा. खारघर, नवी मुंबई, मूळ-नायजेरिया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोहगाव येथील महिलेने तक्रार दिली आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत कामाला असून लोहगाव परिसरात राहायला आहे. सोशल मीडियामुळे त्यांची रोझ नावाच्या एका महिलेशी मैत्री झाली. ओळखीतून महिलेने हिंदुस्थानात हर्बल ऑईल विक्रीचा व्यवसाय करण्याची ऑफर दिली. ऑईल विक्रीतून 40 टक्के नफा देण्याचे आमिष तिने महिलेला दाखविले. त्यामुळे तक्रारदार महिलेने हर्बल व्यवसायासाठी 21 लाख 23 हजार रुपये संबंधित महिलेच्या बँकखात्यात वर्ग केले. पैसे देऊनही ऑईल मिळाले नाही. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सायबर विभागाकडे तक्रार नोंदविली.
मुंबईहून एक महिला ऑईल विक्रीसाठी पुण्यात येणार असल्याची माहिती सायबर विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राधाला ताब्यात घेतले. चौकशीत तिने या प्रकरणातील मुख्य आरोपी नवी मुंबईतील खारघरमध्ये असल्याची माहिती दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी खारघरमधील फर्शीपाडा गावात छापा टाकून एका फ्लॅटमधून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, रोकड जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी लोहगावमधील महिलेला 21 लाखांचा गंडा घातल्याची कबुली दिली. या नायजेरियन टोळीने देशभरात आणखी काही ठिकाणी फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, दीपीका मोहिते, नीतेश शेलार, बाबासाहेब कराळे, अनुप पंडित, माधुरी डोके, जमदाडे यांच्या पथकाने केली.

























































