शिर्डीत रात्रीच्या वेळेसही विमाने उडणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिर्डी येथे साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळय़ासाठी होणारी गर्दी आणि शिर्डी येथील विमानसेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीवरण करण्यात येणार आहे. सध्याची २ हजार ५०० मीटर लांबीची धावपट्टी ३ हजार २०० मीटर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील विविध ठिकाणच्या विमानतळ विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

५० हजार जणांना रोजगार

सामाजिक उपक्रम म्हणून संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहानमध्ये २० एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या संरक्षण साहित्य उत्पादन क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे ५० हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल हब कंपनीला मिहान येथील सेक्टर-१० मधील सुमारे २० एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. सामाजिक जाणिवेतून या प्रकल्पासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

रात्री विमान उतरणार

शिर्डी विमानतळ येथे नाइट लँडिंगची सुविधा तातडीने सुरू होईल या दृष्टीने कामाला गती देण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्र्यांनी पुरंदर, बेलोरा (अमरावती), चंद्रपूर, सोलापूर, शिवनी (अकोला), गोंदूर (धुळे) या विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला. प्रादेशिव विमान सेवा जोडणी योजनेतील कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.