हे सरकार सत्ताधाऱ्यांची खासगी प्रॉपर्टी आहे का? उपसभापतींना वारंवार डावलल्यामुळे विरोधक आक्रमक

विधिमंडळ परिसर आणि मुंबईत होणाऱया सरकारी कार्यक्रमांमधून वारंवार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांचे नाव वगळले जात असल्यावरून परिषदेत विरोधक आक्रमक झाले. हे सरकार सत्ताधाऱयांची खासगी प्रॉपर्टी आहे का, असा सवाल सरकारला विचारत वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे उपसभापती नीलम गोऱहे यांनी सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब केले.

विधान परिषदेत सकाळच्या सत्रात माहितीच्या मुद्दय़ाखाली भाई जगताप यांनी आज संध्याकाळी होणाऱया महाराष्ट्र भूषण या कार्यक्रम पत्रिकेत उपसभापती नीलम गोऱहे यांचे नाव नसल्याचे निदर्शनाला आणून दिले. त्यावर विरोधकांनी हे वारंवार घडत असल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे म्हणाले, गेल्या आठवडय़ात परिषदेचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारी कार्यक्रमावेळी सभागृहाचा मान राखला जाईल, असे म्हटले होते आणि आज दुसऱयाच आठवडय़ात महाराष्ट्र भूषण या सरकारी निमंत्रण पत्रिकेतून उपसभापतींचे नाव गायब आहे. या विरोधी पक्षनेत्यांचेही नाव नाही. हे सरकार काय खासगी प्रॉपर्टी झाली आहे का, हे सरकार हुकूमशाहसारखे वागत आहे. त्यामुळे सभागृहाचा अपमान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सभागृह तहकूब करा, अशी मागणी शिंदे यांनी केले. विधानसभा अध्यक्षांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आहे, मात्र अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेच्या उपसभापतींचे नाव का नाही, पदाचा सन्मान का केला जात नाही, असा सवाल सचिन अहिर यांनी विचारला.

प्रोटोकॉलमधील त्रुटी दूर करू!
सभापती आणि अध्यक्ष ही पदे अराजकीय असतात. विधान परिषदेतील उपसभापतींचा अपमान व्हावा अशी कृती सरकारकडून कधीही होणार नाही. प्रोटोकॉलमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील. असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.