कोठेवाडी खटल्यातील आरोपींच्या सुटकेला सरकार आव्हान देणार, उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व अत्याचाराच्या घटनेत सत्र न्यायालयाने आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. मात्र मोक्काअंतर्गत सर्व मुख्य आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. मोक्काचे स्वरूप बदलल्यामुळे त्यातील काही जणांची मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने मुक्तता केली आहे. मात्र, राज्य सरकार या निकालाला आव्हान देणार असल्याची माहिती शिवसेना उपनेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी दिली आहे. दरम्यान, कोठेवाडी येथील महिलांनी शस्त्र परवान्याची मागणी केली असून ती तत्काळ मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

नगर जिह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथे 20 वर्षांपूर्वी दरोडा आणि महिलांवरील अत्याचाराची घटना घडली होती. राज्यभर हे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यातील काही आरोपींची मोक्का कायद्यांतून निर्दोष सुटका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित बैठकीत डॉ. गोऱहे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्यासह कोठेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या, कोठेवाडी प्रकरणात आरोपींना शिक्षा झालेली आहे. मात्र मोक्काअंतर्गत कारवाईत काही आरोपींना सोडण्यात आले आहे, मात्र सर्वच आरोपींना सोडण्यात आलेले नाहीत. मोक्का कायद्यात झालेल्या बदलांच्या आधारे त्यांची सुटका झाली असली तरी या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोठेवाडी गावातील सीसीटीव्ही दुरुस्त करून द्या, त्याचबरोबर ग्रामरक्षक दल आणि पोलिसांमध्ये समन्वय साधून द्या व गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त द्या अशा सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. तेथील महिलांनी शस्त्र परवान्यांची मागणी केली आहे. त्यानुसार मागतील त्यांना आणि नियमांत बसणाऱयांना शस्त्र्ापरवाने देण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्याचेही डॉ. गोऱहे यांनी सांगितले.