
एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या कोविड काळात आणखी प्रखरपणे समोर आल्या आहेत. त्यात महिलांची संख्या अधिक आहे. ज्येष्ठांसाठी शासनाची मातोश्री वृद्धाश्रम योजना अनेक जिल्ह्यात सुरू करण्यात आली. आता बदलत्या परिस्थितीनुसार मातोश्री वृद्धाश्रमाची संकल्पना नवीन पद्धतीने राबविणे आवश्यक असून तालुका स्तरावर ही योजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी सचिव आणि मंत्रीमंडळ पातळीवर आपण पाठपुरावा करू असे स्पष्ट प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशनतर्फे आयोजित वेबीनारमध्ये त्या बोलत होत्या.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये मनातील नैराश्य घालवण्यासाठी विविध प्रकारचे अध्यात्मिक मेळावे घेणे तसेच त्यांचे प्रबोधनही करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकासंदर्भातले कायद्याबाबत प्रचार आणि प्रसार करून लोकांमध्ये जागृती करणे हे महत्त्वाचे आहे. स्त्री आधार केंद्र आणि जनसेवा फाऊंडेशन तसेच ज्येष्ठ नागरीक संघटनांच्या सहकार्याने मदत केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्यासाठी पथ्ये पाळून तयार केलेले जेवणाचे डबे माफक दरात उपलब्ध करण्यासाठी ज्येष्ठ नागरीक संघटनांनी पुढे यावे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. विनोद शहा व डॉ. मीना शहा यांच्या कार्याचेही गोऱ्हे यांनी कौतुक केले.




























































