नरेंद्र मेहतांविरोधातील आधीच्या तक्रारींची चौकशी करा, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

546

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हे महिलांचे शोषण करत असल्याचा आरोप भाजपच्या महिला नगरसेविकेने मंगळवारी केला. त्यानंतर आज विधान परिषदेत या घटनेचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांचे पेन्शन, भत्ते बंद करण्याची मागणी केली. तर याप्रकरणी पीडित नगरसेविकेने याआधी दोनदा तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारींचे काय झाले याची चौकशी करावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱहे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले.

भाजप नगरसेविकेच्या आरोपांनंतर नरेंद्र मेहता गायब झाले होते. मात्र मध्यरात्री 12 वाजता पोलिसांनी त्यांचे स्टेटमेंट घेतलेले आहे, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. मात्र पीडित नगरसेविकेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. आज मीरा-भाईंदर मनपातील महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर त्या तक्रार दाखल करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तक्रार आल्यानंतर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या