
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी नीलेश चव्हाण याचा शशांक आणि वैष्णवी यांच्यातील वादविवादात सक्रीय सहभाग होता. तसेच, त्याने सासू आणि नणंद यांचे मोबाईल पळविले आहेत. याप्रकरणी नीलेश, राजेंद्र आणि सुशील यांना समोरासमोर बसवून एकत्रित चौकशी करायची आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी फरार नीलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, याप्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत ३ जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.
नीलेशकडे परवानाधारक शस्त्र आहे. नीलेश हा वैष्णवीच्या नणंदेचा जवळचा मित्र आहे. नीलेशने मोबाइलमधील डेटा डिलीट केला असून, तो रिकव्हर करायचा आहे. नीलेशचे इतर आरोपींबरोबर आर्थिक संबंध आहेत. नेपाळ येथे पळून जाण्यासाठी त्याला कोणी मदत केली? नीलेश आणि आरोपी यांच्यात झालेले संभाषण, चॅटिंग तपासायचे आहे, त्यामुळे त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.