ब्राह्मणांकडूनी हे अनुष्ठान करताची कुरवपुर ग्राम समृद्ध झाले…

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“श्री वासुदेव स्वामी कुरवपुरी भिक्षा घेती,
ग्रामे कल्याणासी ब्राह्मणांकडून
मंत्र जप करुनी घेतला स्वामींनी ,
हे अनुष्ठान करताची कुरवपुर
ग्राम समृद्ध झाले “

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री स्वामी महाराज श्री क्षेत्र कुरवपुर येथे आले. त्यांनी प्रथम भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या आसनाला वंदन केले. श्री स्वामी महाराज ज्या वेळी कुरवपूरला आले, त्यावेळी त्या गावात पुजारी कुलकर्णी ब्राह्मणांची अशी दोनच घरे होती.

त्या पुजारी घराण्यातील कर्तबगार पुजारी कालवश झाले होते. त्यांना तीन मुलगे होते. ते तिन्ही मुलगे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची मनोभावे सेवा करीत असत. परंतु या आडगावात मुलगी देण्यास कोणी तयार होईनात. म्हणून मोठे दोघे मुलगे ब्रह्मचारीच राहिले. धाकट्या मुलाचे लग्न कसेबसे झाले. पण त्याची पत्नी पुत्रप्राप्ती न होताच निधन पावली. घरात बाईमाणुस नसल्यामुळे ह्या पुजाऱ्यांच्या आचरणात शिथिलता आली होती. अशा स्थितीत श्रीस्वामी महाराजांची पहिल्या दिवशी भिक्षा झाली.

पुजाऱ्यांच्या घरी त्यांना राहावेसे वाटेना, पण आज्ञेप्रमाणे तेथे आल्यामुळे देवांची आज्ञा झाल्याशिवाय क्षेत्र सोडता येईना. अशा द्विघा मन:स्थितीत असतानाच हे रात्री झोपी गेले. रात्री भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी वेषात श्री स्वामी महाराजांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले “ही भूमी रजकभक्ताने व दिलेली आहे. त्यांच्या उत्पन्नातून येथील नैवेद्य व नंदादीप चालू आहे. त्यामुळे इथे भिक्षा घेण्यास काहीच हरकत नाही. आपण येथील पुजाऱ्यांच्या आचाराकडे अजिबात लक्ष देऊ नये. येथे मुख्यतः द्रव्यशुद्धी व भावशुद्धी असल्यामुळे त्यांच्या हातचे आम्हांला चालते. मग तुम्हांला का चालू नये? परंतु यापुढे तुम्ही येथे कोणालाही आपल्या पायांचे तीर्थ देऊ नये व अनधिकारी माणसाला मंत्रही देऊ नये. येथे येणाऱ्या प्रत्येक साधकाने गाणगापूर व नरसोबाची वाडी या स्थानी वागतात त्याप्रमाणे शुचितेने वागावे, असा उपदेश करावा!” इतके बोलून भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज गुप्त झाले.

जाग आली तेव्हा श्री स्वामी महाराजांच्या मनातील सर्व द्वंद्वे विरघळून गेली होती. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे श्री स्वामी महाराज पुढे त्या पुजाऱ्यायांकडे नि:शंक मनाने भिक्षा घेऊ लागले व त्यांचे संपूर्ण चातुर्मास्य सुखाचे गेले. कुरवपुर ही भूमी सस्यशामल होऊन सर्व लोक सुखी व्हावेत म्हणून लोककल्याणासाठी ब्राह्मणांकडून ऋष्यश्रुंग मंत्राचा जप करवून घेतला. हे अनुष्ठान करताच सर्वत्र उत्तम पाऊस पडून धनधान्याची समृद्धी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या