निमगाव वाघातील विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्तीचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत दिवाळीत फटाके न वाजविण्याची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेली शुभेच्छापत्रे शिक्षकांना देऊन शुभेच्छा दिल्या.

फटाक्यांमुळे निर्माण होणाऱया प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्तीचा निर्धार केला आहे. नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

नवनाथ विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना वायू व ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे व वंचित घटकांना मदत करण्याचे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तुकाराम खळदकर, अशोक डौले, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.