
बलुचिस्तान प्रांतात पंजाब प्रांतातील नऊ प्रवाशांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका बसमधून या प्रवाशांचे अपहरण करण्यात आले होते. बलुचिस्तान प्रांतातील झोब परिसरात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याची माहिती झोबचे अतिरिक्त आयुक्त नावीद आलम यांनी दिली.
सशस्त्र बंडखोरांनी क्वेटाहून लाहोरला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांचे ओळखपत्र तपासले. त्यानंतर बसमधून नऊ प्रवाशांचे अपहरण करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. बलूच बंडखोरांनी असे हल्ले यापूर्वीही केले आहेत. नावीद आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही नऊ मृतदेह रुग्णालयात आणले असून शवविच्छेदन केले जाणार आहे.